दिगंबर पडकर
जळोची- बारामती शहरात मागील अनेक दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. नुकतीच शहरातील समर्थनगर येथे भटक्या कुत्र्यांनी चिमुकलीवर जीवघेणा हल्ला चढवल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे.
समर्थनगर भागातील पार्किंगमध्ये खेळत असणाऱ्या एका ७ वर्षीय चिमुकलीचे आठ ते दहा मोकाट कुत्र्यांनी जीव घेणे लचके तोडले होते. यापूर्वीही शहरात असेच प्रकार घडले होते. मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना त्रास होत असल्यामुळे मोकाट कुत्र्यांबद्दल वेळोवेळी चर्चा होते होती. आणि ती हवेतच विरून जात होती. त्या चर्चेची काहीच फलनिष्पत्ती निघत नव्हती. चर्चेचे गुर्हाळ चर्चेतच संपत होते.
शहरात वाढलेल्या मोकाट कुत्र्यांच्या संदर्भात नगरपालिकेला वेळोवेळी निवेदने दिले. मोर्चे काढले मात्र मोकाट कुत्र्यांचा नगरपालिकेला बंदोबस्त करता आला नव्हता. मात्र चिमुकलीवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर आता नगरपालिकेने मोकाट कुत्री पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार मागील आठ दिवसात चाळीस कुत्रे पकडल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाने दिली. दरम्यान जळोची, तांदळवाडी, रुई भागातील नागरिकांकडूनही भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.