शेलपिंपळगाव : मरकळ अर्थात पिंपळगाव तर्फे खेड या जिल्हा परिषद गटात राजकीय समीकरणे दिवसेंदिवस बदलताना पाहायला मिळत आहेत. या गटात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राहिलेल्या निर्मला पानसरे यांच्या नावाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सातत्याने चर्चा होत आहे. तर त्यांच्या विरोधात खेड बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांनी या जिल्हा परिषद गटात प्रचाराचा आलेख वाढता ठेवला आहे, तर दुसरीकडे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या गटाकडून शरद मोहितेंना संधी दिली जाऊ शकते, अशी शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे माजी आमदार दिलीप मोहिते यांना उमेदवार निवडताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या २०१७ साली झालेल्या निवडणुकीत निर्मला पानसरे यांना दिलीप मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पूर्वीच्या पिंपळगाव – वाफगाव गटातून निवडणूक निवडून आल्यानंतर अडीच वर्षांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळाली. त्याच जोरावर अध्यक्ष असताना अनेक विकासकामे केली असल्याचे सांगत पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी पानसरे यांनी दाखवली आहे. दुसरीकडे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांचे त्यांना आवाहन असणार आहे. विजयसिंह शिंदे यांनी आमदार बाबाजी काळे यांच्या विधानसभा निवडणुकीत सर्वपक्षीय आघाडीचे नेतृत्व करत तालुकाभर प्रचारात सहभाग घेतला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या गटातील बाजार समितीचे काही संचालक आपल्यासोबत घेऊन बाजार समितीत सत्ता बदल घडवून आणला होता. बाजार समितीत सभापती पदावर काम करण्याची संधी मिळताच शिंदे यांनी आपल्या कामाची झलक दाखवून दिली. २०१२ पासून तयारीत असलेले विजयसिंह शिंदे यांना आरक्षणाचाअभावी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवता आली नाही. मात्र, आगामी निवडणुकीत संपूर्ण ताकदीनिशी उतरल्याने चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान आमदार बाबाजी काळे यांच्या गटाकडून जनसेवक म्हणून ओळख असलेल्या श्रीनाथ लांडे यांनी देखील जिल्हा परिषद सदस्य पदाची निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे. आगामी काळात जर विजयसिंह शिंदे यांना उमेदवारी मिळाल्यास लांडे काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे, त्यामुळे या पिंपळगाव जिल्हा परिषद गटात सातत्याने वेगवेगळ्या इच्छुक उमेदवारांकडून प्रचाराचे वेगवेगळे फंडे वापरले जात असताना सातत्याने राजकीय समीकरण बदलत आहे. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला समजला जाणारा हा गट मोहितेंच्या हातातून खेचून घेण्यासाठी आमदार बाबाजी काळे यांनी देखील मोठी ताकद आपल्या दोन्ही इच्छुक उमेदवारांच्या मागे उभी केली असल्याच्या चर्चा सातत्याने होत आहेत. त्यामुळे दिलीप मोहिते पाटील यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राहिलेल्या पानसरे यांना उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागणार असल्याच्या चर्चा देखील सातत्याने होत असतात. पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मात्र या गटातून इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या गटातून ढवळणार तालुक्याचे समीकरण विधानसभा निवडणुकीत ज्याप्रकारे तालुक्याचे राजकीय समीकरण बदलले आणि माजी आमदार मोहिते यांनी समोरच्या उमेदवारापेक्षा बालेकिल्लात पीछेहाट झाली त्याप्रमाणे आगामी काळात याच गटातून तालुक्याचे राजकीय समीकरण ढवळण्याची चिन्हे आहेत.