Mohan Bhagwat at New York: ‘भारतात मुस्लीम नको म्हणणारा हिंदू असू शकत नाही’; मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य
Mohan Bhagwat at New York: “भारतात एकही मुस्लीम व्यक्ती असू नये, असं जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल, तर ती व्यक्ती स्वतःला हिंदू म्हणवू शकत नाही,” असं महत्त्वाचं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं.

Mohan Bhagwat at New York: “भारतात एकही मुस्लीम व्यक्ती असू नये, असं जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल, तर ती व्यक्ती स्वतःला हिंदू म्हणवू शकत नाही,” असं महत्त्वाचं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे आयोजित ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’ या कार्यक्रमात जगभरातील धार्मिक नेत्यांसमोर ते बोलत होते.
मोहन भागवत यांनी आपल्या भाषणातून एकता, विविधता आणि मानवतेचा संदेश दिला. सर्व धर्म वेगवेगळे असले तरी मानवता एक आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. “सर्व धर्म एकाच सत्याकडे घेऊन जातात, ही हिंदू विचारसरणीची मूलभूत धारणा आहे. त्यामुळे माणसांमध्ये कोणताही भेदभाव असू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीचा आदर हाच मानवतेचा खरा पाया आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
भारत-अमेरिकेच्या ‘डीएनए’मध्ये विविधता आणि एकता Mohan Bhagwat at New York:
भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या मूलभूत रचनेत एकता आणि विविधता असल्याचंही भागवत यांनी नमूद केलं. अमेरिकेच्या संदर्भात ‘बहुविधता’ हा शब्द वापरला जातो, तर भारतासाठी ‘विविधतेतील एकता’ ही संकल्पना महत्त्वाची असल्याचं ते म्हणाले.
“भारताच्या वाट्याला आलेली नियती म्हणजे विविधतेतील एकता स्वतः अनुभवणे आणि वेळोवेळी जगाला त्याची जाणीव करून देणे. आपण एक आहोत आणि विविधतेमुळेच त्या एकत्वाला अधिक शोभा प्राप्त होते,” असं भागवत यांनी सांगितलं.
‘धर्म वेगवेगळे असू शकतात, पण मानवता एक’
आपल्या भाषणात भागवत यांनी धर्म आणि मानवतेच्या नात्यावरही भाष्य केलं. “धर्म वेगवेगळे असू शकतात, पण मानवता एक आहे. सत्य एकच आहे आणि मानवता हे त्या सत्याचंच फळ आहे. हे सत्य वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होतं. मात्र, माणूस अनेकदा स्वतःच्या अनुभवांच्या आणि मर्यादांच्या चौकटीत अडकतो,” असं ते म्हणाले.
समाजाला शिक्षित आणि एकजूट करण्याची गरज
समाजाला योग्य दिशा देण्यासाठी शिक्षण आणि एकजूट महत्त्वाची असल्याचंही मोहन भागवत यांनी सांगितलं. “जर आपण समाजाला शिक्षित केलं नाही, तर समाजाची दिशाभूल होऊ शकते. इतिहासात कधीतरी असं घडलं आणि त्यानंतर आपला समाज व देश परकीय आक्रमणांचं लक्ष्य बनला. त्यामुळे अनेक गोष्टी आपण गमावल्या,” असं त्यांनी नमूद केलं.
‘ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी धार्मिक विधी आवश्यक’ Mohan Bhagwat at New York:
जगात अनेक धर्म असून प्रत्येक धर्माची ओळख त्याच्या धार्मिक परंपरा आणि विधींमधून होत असल्याचं भागवत यांनी सांगितलं. धार्मिक शिस्त स्वीकारण्यासाठी आणि ईश्वरापर्यंत पोहोचण्याच्या मार्गाचा अवलंब करण्यासाठी धार्मिक विधींचं पालन आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे आयोजित या कार्यक्रमाचं आयोजन ‘अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग’ (AHEAD) या संस्थेने केलं होतं. जगभरातील धार्मिक नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात मोहन भागवत यांनी भारताच्या ‘विविधतेतील एकता’ या विचाराचा जागतिक संदर्भात पुनरुच्चार केला.





