Mohammed Siraj : सिराजच्या घरातील भिंतीवर असलेली एक खास फोटो फ्रेम का होतेय व्हायरल? जाणून घ्या कारण

ती खास वस्तू कोणती आहे?
मोहम्मद सिराज नुकता इंग्लंड दौऱ्यानंतर मायदेशी परतला आहे. अशात शनिवारी मोहम्मद सिराजचा घरी निवांत फोन बघत बसलेला फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याच्या घरातील भिंतीवर एका खास वस्तूची फ्रेम आहे. खरंतर, सिडनी कसोटीनंतर विराट कोहलीने आपली स्वाक्षरी असलेली जर्सी मोहम्मद सिराजला भेट दिली होती. हा सामना कोहलीच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला होता. त्या जर्सीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
विराटची जर्सी सिराजसाठी आहे खास?
Virat Kohli’s final Test jersey framed at Mohammed Siraj’s home. 🥹❤️ pic.twitter.com/UgQBN7UgW0
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 9, 2025
मोहम्मद सिराजच्या घरी विराट कोहलीची शेवटची कसोटी जर्सी विशेष स्थानावर सजली आहे. सिराजसाठी ही जर्सी केवळ कपडा नाही, तर सन्मान, मैत्री आणि क्रिकेटच्या सर्वात मोठ्या व्यासपीठावर एकत्र खेळलेल्या सामन्यांची आठवण आहे. या जर्सीच्या प्रत्येक धाग्यात वर्षानुवर्षांची मेहनत, विजय-पराजयाची आठवण आणि प्रत्येक सामन्यात झोकून दिलेल्या प्रयत्नांची कहाणी दडली आहे.
सिराज: भारतीय गोलंदाजीचा आधारस्तंभ –
गेल्या काही वर्षांत सिराज भारतीय वेगवान गोलंदाजीचा महत्त्वाचा आधारस्तंभ बनला आहे. इंग्लंडविरुद्धच्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी मालिकेत त्याने 5 कसोटी सामन्यांत 23 विकेट्स घेतले आणि जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व केले. द ओव्हल येथील 5/104 चा त्याचा शानदार स्पेल भारताच्या ऐतिहासिक 6 धावांनी मिळालेल्या विजयाचा निर्णायक क्षण ठरला. हा भारतीय कसोटी इतिहासातील सर्वात कमी धावांनी मिळालेला विजय आहे. 41 कसोटी सामन्यांत 123 विकेट्स सिराजने दाखवून दिले आहे की, दबावातही तो सामना पलटवण्याची क्षमता बाळगतो.
हेही वाचा – ZIM vs NZ : न्यूझीलंडने मोडला ६७ वर्षांचा विक्रम, कसोटी इतिहासातील नोंदवला तिसरा सर्वात मोठा विजय
कोहलीच्या पोस्टने सिराज भावूक –
पाचव्या कसोटीतील विजयानंतर विराट कोहलीने सोशल मीडियावर लिहिले, “टीम इंडियाचा अप्रतिम विजय. सिराज आणि प्रसिधच्या उत्साह आणि मेहनतीमुळे हे यश मिळाले. विशेषतः सिराज, जो संघासाठी सर्वस्व झोकून देतो. त्याच्यासाठी खूप आनंद आहे.” याला रिप्लाय देताना सिराज भावूक होऊन म्हणाला, “धन्यवाद भैया, माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल.”





