Mohammed Shami Politics : “तो किंवा त्याचा भाऊ निवडणुकीसाठी उभा राहिला, तर मीही मैदानात उतरणार….”, शमीला पत्नीचा थेट इशारा
Mohammed Shami Politics : मोहम्मद शमीच पत्नी हसीन जहाँ यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केली असून, तिकीट न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचेही म्हटले आहे.

Mohammed Shami Jayant Chaudhary Meeting Hasin Jahan Threatens To Contest UP Election 2027 : टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि राष्ट्रीय लोकदलाचे (रालोद) राष्ट्रीय अध्यक्ष जयंत चौधरी यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीनंतर उत्तर प्रदेशातील अमरोहाचे राजकारण चांगलंच तापलं आहे. २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शमी किंवा त्याचा भाऊ हसीब निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात, अशा जोरदार चर्चांना उधाण आले आहे. अद्याप यावर कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी या संभाव्य राजकीय प्रवेशामुळे संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे ढवळून निघाली आहेत.
‘शमी किंवा भाऊ उतरल्यास मी लढणार’; हसीन जहाँचा थेट एल्गार!
या राजकीय घडामोडींमध्ये शमीची पत्नी हसीन जहाँच्या (Hasin Jahan) एका स्फोटक विधानाने वादाला नवी धार दिली आहे. एका मुलाखतीत हसीन जहाँ म्हणाली, “जर शमी किंवा त्याचा भाऊ हसीब निवडणुकीच्या मैदानात उतरले, तर मी त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणार. कोणत्याही राजकीय पक्षाने मला तिकीट दिले नाही, तरीही मी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरून त्यांचा थेट सामना करण्यास पूर्णपणे तयार आहे.”
अमरोहा सदर मतदारसंघ समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला; महबूब अलींचे वर्चस्व!
🚨 Mohammed Shami meets UP CM Yogi Adityanath and RLD president Jayant Chaudhary.
Either Mohammed Shami himself or his elder brother Haseeb Ahmed could contest the Amroha seat on an NDA ticket.
Shami is currently not getting a chance in the Indian team and is only playing… pic.twitter.com/AKOUQ4XWY7
— TEJASH 🚩 (@Tejashyy) September 21, 2026
अमरोहा सदर विधानसभा मतदारसंघ हा समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते महबूब अली यांचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. २००२ पासून सलग या जागेवर त्यांचेच वर्चस्व राहिले असून २०२२ च्या निवडणुकीत त्यांनी १.२८ लाखांपेक्षा जास्त मते मिळवून भाजप उमेदवाराचा पराभव केला होता. अशा स्थितीत शमी कुटुंबाचा संभाव्य राजकीय प्रवेश आणि हसीन जहाँची आक्रमक भूमिका यामुळे या मतदारसंघातील लढत तिरंगी आणि अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
२०१८ पासून न्यायालयीन वाद; आता निवडणुकीच्या आखाड्यात जुंपणार!
कौटुंबिक वाद आणि गंभीर आरोपांनंतर मार्च २०१८ पासून मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ एकमेकांपासून विभक्त राहत आहेत. न्यायालयात दोघांमध्ये अनेक खटले सुरू असतानाच, हसीन जहाँने घेतलेल्या या आक्रमक राजकीय भूमिकेमुळे कौटुंबिक आणि न्यायालयीन वाद आता निवडणुकीच्या रणांगणावर आमनेसामने येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.





