Mohammed Shami : मोहम्मद शमीचा कसोटी क्रिकेटला अलविदा! १३ वर्षांच्या कारकिर्दीतील या ५ अविस्मरणीय कामगिरी ठरल्या खास
Mohammed Shami : आपल्या भेदक गोलंदाजीने जगभरातील फलंदाजांना घाम फोडणाऱ्या शमीने कसोटी क्रिकेटमध्ये अनेक संस्मरणीय कामगिरी केल्या आहेत.

Mohammed Shami : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आपल्या १३ वर्षांच्या शानदार कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. शमीच्या या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
आपल्या भेदक गोलंदाजीने जगभरातील फलंदाजांना घाम फोडणाऱ्या शमीने कसोटी क्रिकेटमध्ये अनेक संस्मरणीय कामगिरी केल्या आहेत. त्या कोणत्या ते जाणून घेऊयात. शमीने आपल्या कसोटी कारकिर्दीत ६४ सामने खेळताना २२९ विकेट्स घेतल्या. यामध्ये सहा वेळा एका डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम त्याने केला. सीम मूव्हमेंट, अचूक टप्प्यावर गोलंदाजी आणि रिव्हर्स स्विंग ही त्याची प्रमुख ताकद होती.
कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीची घोषणा करताना शमीने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली. कसोटी क्रिकेटला निरोप देत असलो, तरी या खेळाशी जोडलेल्या आठवणी कायम मनात राहतील, अशी भावना त्याने व्यक्त केली.
१ सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५/४४; भारताच्या ऐतिहासिक विजयात मोलाचा वाटा
डिसेंबर २०२१ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन येथे झालेल्या कसोटी सामन्यात शमीने आपल्या गोलंदाजीची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली. पहिल्या डावात त्याने अवघ्या ४४ धावा देत पाच विकेट्स मिळवल्या. सुपरस्पोर्ट पार्कच्या खेळपट्टीवर सीम मूव्हमेंटचा प्रभावी वापर करत त्याने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना अडचणीत आणले.
या कामगिरीदरम्यान शमीने कसोटी क्रिकेटमध्ये २०० विकेट्सचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पाचवा वेगवान गोलंदाज ठरला. या सामन्यात भारताने ११३ धावांनी विजय मिळवला.
२ विशाखापट्टणममध्ये ५/३५; दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची उडवली दाणादाण
ऑक्टोबर २०१९ मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे झालेल्या कसोटी सामन्यात शमीने दुसऱ्या डावात भेदक गोलंदाजी केली. खेळपट्टीकडून वेगवान गोलंदाजांना फारशी मदत मिळत नसतानाही त्याने ३५ धावांत पाच विकेट्स घेतल्या.
आपला वेग आणि अचूक टप्पा यांचा सुरेख मेळ साधत शमीने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना मोठी खेळी उभारण्याची संधी दिली नाही. त्याने फाफ डु प्लेसिस आणि क्विंटन डी कॉक यांसारख्या महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केले.
३ जोहान्सबर्गमध्ये ५/२८; आव्हानात्मक खेळपट्टीवर शमीचा जलवा
जानेवारी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना जोहान्सबर्ग कसोटीत शमीने आणखी एक संस्मरणीय कामगिरी केली. वाँडरर्सच्या कठीण खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेसमोर २४१ धावांचे लक्ष्य होते. हे लक्ष्य रोखण्यासाठी भारतीय गोलंदाजांवर मोठी जबाबदारी होती.
दुसऱ्या डावात शमीने अवघ्या २८ धावा देत पाच फलंदाजांना माघारी धाडले. त्याच्या अचूक आणि वेगवान गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी कोलमडली. या कामगिरीच्या जोरावर भारताने हा सामना ६३ धावांनी जिंकला.
४ कसोटी पदार्पणातच नऊ विकेट्स; वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्याच सामन्यात छाप
मोहम्मद शमीने नोव्हेंबर २०१३ मध्ये कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
पहिल्या डावात शमीने ७१ धावांत चार विकेट्स मिळवल्या, तर दुसऱ्या डावात ४७ धावांत पाच फलंदाजांना बाद केले. अशा प्रकारे पदार्पणाच्या कसोटीत त्याने एकूण ११८ धावा देत नऊ विकेट्स मिळवल्या.
५ पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६/५६; कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी
मोहम्मद शमीच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे नोंदवला गेला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात त्याने ५६ धावा देत सहा विकेट्स मिळवल्या. त्याच्या वेगवान आणि प्रभावी गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारणे कठीण झाले.





