Mohammed al-Bashir : सीरियामध्ये काळजीवाहू पंतप्रधानपदी मोहम्मद अल-बशीर यांची नियुक्ती

दमास्कस : सीरियामध्ये मोहम्मद अल-बशीर यांची काळजीवाहू पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील वर्षी १ मार्चपर्यंत ते हंगामी सरकारचे नेतृत्व करतील,असे बशीर यानी वृत्तवाहिनीवरून केलेल्या संबोधनात सांगितले.सीरियामध्ये बंडखोरांच्या आंदोलनानंतर बशर अल असद यांनी देश सोडून पलायन केले आहे. या बंडखोरी करणाऱ्या गटाचे नेतृत्व करणारे मोहम्मद अल-बशीर यांनी यापुर्वी वायव्येकडील एका छोट्या भागात प्रशासकीय काम केले आहे.
देशातील नागरिकांची सुरक्षा राखणे, संस्थांच्या अखंडतेचे रक्षण करणे आणि राज्याचे तुकडे होण्यापासून रोखणे ही आपल्या सरकारची जबाबदारी आहे, असे बशीर यांनी म्हटले आहे. माजी अध्यक्ष बशर-अल-असद यांना पदच्युत केल्यानंतर लोकांना स्थिरता आणि शांतता अनुभवण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान सीरियामध्ये नव्याने स्थापन झालेल्या हंगामी सरकारमधील मंत्र्यांनी काल राज्य संस्थांचे हस्तांतरण योग्य पद्धतीने केले जाण्यासाठी आणि सार्वजनिक सेवांचे सातत्य अबाधित राखण्यासाठी पदच्युत अध्यक्ष बशर अल-असद यांच्या सरकारमधील प्रशासनाच्या सदस्यांची भेट घेतली असून सीरियातल्या समाजाच्या आकांक्षा पूर्ण करणारे नवीन सरकार स्थापन होईपर्यंत मार्च २०२५ पर्यंत सीरियाच्या कारभाराचे व्यवस्थापन करण्याचे काम त्यांच्या मंत्रिमंडळाला दिले असल्याचेही बशीर यांनी सांगितले.
इस्रायलने सीरियात घुसखोरी करू नये…
संयुक्त राष्ट्र सीरियाच्या प्रादेशिक अखंडतेच्या कोणत्याही उल्लंघनाच्या विरोधात आहे, असे संयुक्त राष्ट्र महासचिवांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी म्हटले आहे. बशर-अल-असद सरकार उलथून टाकल्यानंतर इस्त्रायली संरक्षण दल-आयडीएफने गोलान हाइट्समधील बफर झोनवर कब्जा केल्यानंतर त्यांनी हे विधान केले आहे.
आयडीएफने बफर झोनचा ताबा घेतल्यानंतर झालेल्या कराराच्या उल्लंघनाबाबत संयुक्त राष्ट्राची भूमिका पूर्णपणे स्पष्ट आहे. सध्याच्या परिस्थितीत या प्रदेशातील कोणत्याही शेजाऱ्याने सीरियाच्या भूभागावर कब्जा करू नये, असे दुजारिक यांनी पत्रकारांना सांगितले. दरम्यान, सीरियासाठी संयुक्त राष्ट्र महासचिवांचे विशेष दूत गेयर पेडरसन यांनी इस्रायलला सीरियातील लष्करी कारवाया थांबवण्याचे आवाहन केले आहे.





