Rohit Sharma : ‘रोहितने मनाचा मोठेपणा दाखवला, तरीही एवढी घाई का?’, मोहम्मद कैफचा बीसीसीआयला संतप्त सवाल

Mohammad Kaif on Rohit Sharma : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून, टीम इंडियाला आता वनडे क्रिकेटसाठी नवा कर्णधार मिळाला आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या रोहित शर्माच्या जागी शुबमन गिलला वनडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. रोहित शर्मा संघात असतानाही गिल ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. मात्र, या निर्णयावर माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने बीसीसीआयच्या निवड समितीवर जोरदार टीका केली आहे.
मोहम्मद कैफच्या मते, 16 वर्षे भारतीय क्रिकेटसाठी योगदान देणाऱ्या रोहित शर्माला आणखी एक वर्ष कर्णधारपद देणे बीसीसीआयला शक्य झाले नाही. रोहितच्या नेतृत्वातील यशस्वी कामगिरीची आकडेवारी मांडत कैफने निवड समितीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्याचबरोबर मोहम्मद कैफने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर करत आपली खंत व्यक्त केली आहे.
रोहितला आणखी एक वर्ष देऊ शकलो नाही –
True leader, great ambassador.@ImRo45 pic.twitter.com/phOyQjbydU
— Mohammad Kaif (@MohammadKaif) October 4, 2025
मोहम्मद कैफ व्हिडीओमध्ये म्हणाला, “रोहित शर्माने भारतीय क्रिकेटसाठी 16 वर्षे दिली, पण बीसीसीआय निवड समिती त्याला आणखी एक वर्ष कर्णधारपद देऊ शकली नाही.” कैफने रोहितच्या नेतृत्वातील यशस्वी आकडेवारी मांडली. 2023 च्या वनडे विश्वचषकातील अंतिम सामना सोडला तर, रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसी स्पर्धांमध्ये 16 पैकी 15 सामने जिंकले. रोहितच्या कर्णधारपदात भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, जिथे तो अंतिम सामन्यात सामनावीर ठरला. या यशाकडे दुर्लक्ष करून गिलला कर्णधारपद देण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे कैफने म्हटले आहे.
हेही वाचा – Irani Cup 2025 : अंशुल कंबोजच्या भेदक गोलंदाजीने विदर्भ जोमात, रेस्ट ऑफ इंडियासमोर ३६० धावांचे कठीण आव्हान!
रोहितने मोठेपण दाखवले, तरीही दुर्लक्ष –
मोहम्मद कैफने पुढे सांगितले की, भारतीय क्रिकेटमध्ये “चालतंय तोवर चालवायचं” अशी परंपरा आहे. मात्र, रोहित शर्माने तसे न करता मनाचा मोठेपणा दाखवला. टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने नव्या खेळाडूंना संधी मिळावी यासाठी त्या प्रकारातून निवृत्ती घेतली. स्वत:ला बाजूला ठेवत त्याने नव्या खेळाडूंना घडवले. अशा रोहितला आणखी एक वर्ष कर्णधारपद देणे शक्य झाले नाही, याची खंत कैफने व्यक्त केली.
हेही वाचा – IND vs PAK : सोनी लिव्ह नाही, ‘इथे’ पाहता येणारा भारत-पाकचा थरार, सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही
एवढी घाई का? कैफचा बीसीसीआयला सवाल –
रोहित शर्माने अवघ्या आठ महिन्यांत दोन आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या. तरीही त्याच्याऐवजी शुबमन गिलकडे वनडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. कैफच्या मते, गिलमध्ये नक्कीच क्षमता आहे आणि तो भविष्यात चांगला कर्णधार होऊ शकतो. मात्र, त्याच्याकडे अजून खूप वेळ आहे. रोहितच्या नेतृत्वातील यशस्वी काळातच गिलला कर्णधारपद देण्याची घाई का, असा थेट सवाल कैफने बीसीसीआयच्या निवड समितीला विचारला आहे.





