IND vs PAK : सोनी लिव्ह नाही, ‘इथे’ पाहता येणारा भारत-पाकचा थरार, सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही

IND vs PAK Match Live Streaming Details : आयसीसी महिला वनडे विश्वचषक 2025 मधील सहावा सामना क्रिकेटप्रेमींसाठी एक महासंग्राम ठरणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. बऱ्याच कालावधीनंतर हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्ध मैदानात उतरत असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या.
सामना कुठे आणि कसा पाहता येणार?
विशेष म्हणजे, आशिया कप 2025 मधील वादांमुळे या सामन्याचा थरार आणखी वाढला असून सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आयसीसी महिला वनडे विश्वचषक 2025 चे अधिकृत प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होत आहे. भारत-पाकिस्तान हा सामना स्टार स्पोर्ट्स चॅनल्सवर दुपारी 3 वाजल्यापासून थेट पाहता येईल. डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा सामना जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर विनामूल्य उपलब्ध असेल. विशेष बाब म्हणजे, यासाठी कोणतेही सब्स्क्रिप्शन आवश्यक नाही. मात्र, हा सामना सोनी लिव्हवर प्रसारित होणार नाही.
भारतीय संघ आत्मविश्वासाने सज्ज –
कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने स्पर्धेची सुरुवात दमदार विजयाने केली आहे. पहिल्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत भारताने आपली ताकद दाखवली आहे. स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांचा फॉर्म संघासाठी मोठी जमेची बाजू आहे. सध्या संघाचा आत्मविश्वास शिगेला असून, खेळाडू कोणत्याही परिस्थितीत उत्तम कामगिरी करण्यास तयार आहेत.
हेही वाचा – AUS vs NZ : मिशेल मार्शच्या ऐतिहासिक शतकाने न्यूझीलंडला चारली धूळ, २० वर्षांपूर्वीचा पॉन्टिंगचा मोडला विक्रम
पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानचा संघ दबावात –
पाकिस्तानच्या महिला संघाला मात्र स्पर्धेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर संघावर मोठा दबाव आहे. कर्णधार फातिमा सनावर आता संघाला सावरण्याची जबाबदारी आहे. भारताविरुद्ध पाकिस्तानचा विश्वचषकातील रेकॉर्ड फारसा चांगला नाही. आतापर्यंत भारताने विश्वचषकात पाकिस्तानवर नेहमीच वर्चस्व राखले आहे.





