सुरवाल – भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व स्टार क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांच्या चारचाकी वाहनास आज राजस्थानातील सुरवाल येथे अपघात झाल्याचे वृत्त आहे. लालसोट-कोटा महामार्गावर सूरवाल ठाण्याजवळ हा अपघात झाला. प्राप्त माहितीनुसार मोहम्मद अझरुद्दीन हे कुटुंबीयांसह रणथंबोर येथे येत असताना हा अपघात झाला. दैव बलवत्तर म्हणून अझरुद्दीन हे या मोठ्या अपघातातून बालंबाल बचावले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, अझरुद्दीन यांच्या कारचा टायर निघाल्याने वाहनावरील ताबा सुटला. यानंतर त्यांचे चारचाकी वाहन थेट रस्त्यानजीक असलेल्या ढाब्यात घुसले. हा मोठा अपघात घडल्यानंतर देखील अझरुद्दीन व त्यांचे कुटुंबीय सुखरूप असल्याची माहिती त्यांच्या स्वीयसहाय्यकाने दिली. मात्र ढाब्यावर काम करत असलेला चाळीस वर्षीय युवक जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातामध्ये अझरुद्दीन यांच्या वाहनांचीही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ते दुसऱ्या वाहनाने नियोजित स्थळाकडे रवाना झाले आहेत. राजस्थान पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.