मोदींचे पॅकेज म्हणजे देशाची क्रूर थट्टा – सोनिया गांधी

नवी दिल्ली: मोदी सरकारने जाहीर केलेले 20 लाख कोटींचे पॅकेज म्हणजे देशाची क्रूर थट्टा आहे, अशी सडतोड टीका कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. देशभरात करोनामुळे स्थलांतरित मजुरांचे हाल होत असून सुमारे 13 कोटी कुटुंबीयांकडे केंद्राने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप त्यांनी केला.
करोनाच्या पार्श्वभूमिवर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सगळ्या विरोधी पक्षांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयोजीत पत्रकार परिषदेत सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर ताशेरे आढले. अशा प्रकारचे पॅकेज जाहीर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची सल्लामसलत आपल्या विरोधी पक्षांसोबत केली पाहिजे, असे या सरकारला वाटले नाही आणि त्यांनी एकतर्फी निर्णय घेऊन टाकला, असेही सोनिया गांधींनी म्हटले आहे.
सध्या देशात करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. तसेच अम्फान या चक्रीवादळाचाही फटका बसला आहे. अशा सगळ्या परिस्थितीत करोनामुळे जी स्थिती निर्माण झाली ती हाताळण्यात मोदी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे.
करोनाचं संकट देशात नंतर आले, त्याआधीच देशाच्या अर्थव्यवस्थेचा आलेख खालावला होता. नोटाबंदी, जीएसटी यासारखे निर्णय मोदी सरकारने एकतर्फी देशावर लादले. यामुळे 2017 पासूनच देशाची आर्थिक घडी बिघडण्यास सुरुवात झाली. हे सरकार चुकीच्या पद्धतीने निर्णय घेत पुढे जात राहिले, असेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.





