Sanjay Raut : मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातील असेल; संजय राऊतांच्या दाव्यावर फडणवीसांचं मोठं विधान

Sanjay Raut : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (दि. ३०) नागपूरच्या रेशीमबागमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली होती. यानंतर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्या राजकीय वारसादाराबद्दल विधान केले आहे. नरेंद्र मोदी यांचा पुढचा वारसदार कोण असेल? असा प्रश्न राऊतांना माध्यमांकडून विचारण्यात आला होता. यावर संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या या विधानावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, वडील जिवंत असताना मुलांचा विचार करायचा नाही, तो होत नसतो. त्यामुळे मोदींचा उत्तराधिकारी निवडण्याची वेळ अजून आली नाही. तसेच माझा विषय आहे, मााझा त्याच्याशी संबंध नाही, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले, या क्षणी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असे दिसत आहे. म्हणूनच नरेंद्र मोदींना बोलवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. संघाची चर्चा ही बंद दाराआड असते. ती बंद दाराआडची चर्चा शक्यतो बाहेर येत नाहीत. तरीही काही संकेत असतात, ते संकेत स्पष्ट आहेत. पुढील नेता संघ ठरवेल आणि बहुतेक तो महाराष्ट्रातील असेल, असे संजय राऊत यांनी म्हटले. दरम्यान संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांच्या या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याचे कोणतेही कारण नाही, नरेंद्र मोदी हे आमचे नेते आहेत, अजून बरीच वर्ष ते काम करणार आहेत. आमच्या सगळ्यांचा आग्रह आहे, 2029 चे पंतप्रधान म्हणून आम्ही नरेंद्र मोदी यांच्याकडेच पाहतो आहोत. पूर्ण देशही तेच बघत आहे, त्यामुळे आत्ता अशी चर्चा करणे योग्य होणार नाही. भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो. ही सगळी मुघल संस्कृती आहे, त्यामुळे आत्ता कोणाचाही, कुठेही उत्तराधिकारी निवडण्याची वेळही आलेली नाही, तसा प्रश्नही नाही. जोपर्यंत माझा विषय आहे, मााझा त्याच्याशी संबंध नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा
पंतप्रधान बनण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये नागपूरच्या रेशीमबागमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली होती. त्यानंतर काल (दि. ३०) पंतप्रधान पदाच्या तिसऱ्या कार्यकाळात नरेंद्र मोदींनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली. मोदी यांनी १५ मिनिटांचा कालावधी संघ कार्यालय परिसरात घालवला. मोदींनी आद्या सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवार यांचे समाधीस्थळ, तसेच द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांच्या यज्ञवेदीस्वरूप स्मृतिचिन्हाचे दर्शन घेतले. तसेच मोदींनी नागपूर दौऱ्यावेळी दीक्षाभूमीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचेही दर्शन घेतले आणि भगवान गौतम बुद्ध यांना मोदी यांनी नमन केले.





