BRICS 2026 : ‘दुश्मन नव्हे, शेजारी म्हणून पाहा’; नरेंद्र मोदी-शी जिनपिंग भेटीआधी चीनचा सूर बदलला
BRICS 2026 : ब्रिक्स शिखर परिषदेसाठी शी जिनपिंग भारतात येत आहेत. मोदी-शी भेटीआधी चीनने भारतासोबतचे मतभेद योग्य पद्धतीने सोडवण्यावर भर दिला आहे.

BRICS 2026 : ब्रिक्सच्या १८व्या शिखर परिषदेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग शनिवारी नवी दिल्ली येथे येत आहेत. या दौऱ्यात त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा होणार आहे. या भेटीआधी चीनच्या भूमिकेत सकारात्मक बदल दिसून आला आहे. भारत आणि चीनने आपापसांतील मतभेद योग्य पद्धतीने सोडवावेत आणि संबंधांकडे दीर्घकालीन व धोरणात्मक दृष्टिकोनातून पाहावे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी म्हटले.
शी जिनपिंग यांचा जवळपास सात वर्षांनंतर भारताचा हा पहिलाच दौरा आहे. यापूर्वी २०१९ मध्ये चेन्नईतील मामल्लपुरम येथे त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत अनौपचारिक चर्चा केली होती. २०२० मध्ये पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सीमेवर निर्माण झालेल्या तणावानंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाली होती. त्यामुळे मोदी-शी यांची आगामी भेट महत्त्वाची मानली जात आहे.
चीनने काय म्हटले?
बीजिंगमध्ये पत्रकारांशी बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी सांगितले की, दोन्ही देशांच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली चीन भारतासोबत काम करण्यास तयार आहे. भारत आणि चीनने एकमेकांकडे चांगले शेजारी आणि परस्परांच्या प्रगतीला मदत करणारे भागीदार म्हणून पाहावे, असेही त्यांनी म्हटले.
संवाद आणि सहकार्य वाढवून दोन्ही देशांमधील मतभेद शांततेच्या मार्गाने सोडवता येतील, अशी अपेक्षाही माओ निंग यांनी व्यक्त केली. युक्रेन युद्ध आणि मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स हे विकसनशील अर्थव्यवस्थांसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचे त्यांनी सांगितले. शांतता, सुरक्षा आणि सहकार्यासाठी चीनच्या भूमिकेचाही त्यांनी उल्लेख केला.
संबंधांना नवी दिशा मिळणार?
भारताच्या अध्यक्षतेखाली १२ आणि १३ सप्टेंबरला नवी दिल्ली येथे ब्रिक्स शिखर परिषद होत आहे. लडाखमधील तणावानंतर भारत-चीन संबंध सुधारण्यासाठी या बैठकीकडे महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे मोदी आणि शी यांच्यातील चर्चेतून दोन्ही देशांच्या संबंधांना कोणती नवी दिशा मिळते, याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष लागले आहे.





