Jairam Ramesh : तारीफ पसंत असणाऱ्या मोदींना टेरिफची चिंता नाही; कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांची टीका

नवी दिल्ली : भारतावर जशास तसे आयात शुल्क (टेरिफ) लावण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. त्यावरून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. केवळ तारीफ (स्तुती) पसंत असणाऱ्या मोदींना टेरिफची चिंता नाही, असे त्यांनी म्हटले. आयात शुल्कासंदर्भात ट्रम्प यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या धमक्यांचा मुद्दा कॉंग्रेस संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडेल.
त्या मुद्द्यावर मोदी मौन बाळगून आहेत. तर, परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर अमेरिकेचे प्रवक्ते असल्यासारखे बोलत आहेत. अमेरिकेच्या धमक्यांना योग्य उत्तर देण्यासाठी सामूहिक निर्धार दाखवण्याची गरज आहे, असे भाष्य रमेश यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीवेळी केले. मोदी 56 इंच छातीविषयी बोलतात. पण, ती छाती कुठेय? पंतप्रधानपदी इंदिरा गांधी असताना भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न अमेरिकेने केला.
त्यावेळी भारताच्या हिताची असेल तीच कृती करू, असे इंदिरा गांधी यांनी निक्षून सांगितले. मात्र, मोदी केवळ नमस्ते ट्रम्प, प्रिय मित्र ट्रम्प असे म्हणत आहेत. ट्रम्प यांना आलिंगन देण्यात मोदी धन्यता मानत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.





