Priyanka Gandhi : “मोदींचा जनतेशी संबंध राहिलेला नाही…”; लोकसभेतील भाषणावर प्रियांका गांधींची टीका

Priyanka Gandhi – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतील भाषणावर विरोधकांनी जोरदार टीकास्त्र सोडले. मोदींचा जनतेशी आणि त्यांच्या गरजांशी संबंध राहिल्याचे वाटत नाही. त्यांच्या भाषणातून तसेच सूचित झाले, असे कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी म्हटले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर लोकसभेत दोन दिवस चर्चा झाली. त्या चर्चेला मंगळवारी उत्तर देताना मोदींनी विरोधकांवर टीकेचे प्रहार केले. त्यावरून विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पलटवार केला.
मोदींनी निवडणुकीतील प्रचाराला शोभणारे भाषण केले. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते भाषण झाले. विरोधकांनी काही महत्वाचे मुद्दे चर्चेवेळी उपस्थित केले.
मात्र, त्यावर मोदींनी काहीच उत्तर न दिल्याचे आश्चर्य वाटले, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी दिली. समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही मोदींच्या भाषणाविषयी असमाधान व्यक्त केले.
महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीची मोठी दुर्घटना घडली. मात्र, दुर्घटनेचा कुठलाच उल्लेख करण्यात आला नाही. मोदींना खेळण्यांची चिंता वाटते. मात्र, त्यांच्या सरकारला मानवी जीवाबद्दल कुठली काळजी असल्याचे वाटत नाही, असे ते म्हणाले.
राष्ट्रपतींनी अभिभाषणात जे नमूद केले; त्याचाच पुनरूच्चार मोदींनी केला. विरोधकांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले नाही, अशी नाराजी तृणमूल कॉंग्रेसचे नेते सौगत रॉय यांनी व्यक्त केली.





