‘मोदी सरकार धमक्यामुळे स्थापन झाले’; ममता बॅनर्जी यांचा जोरदार घणाघात

Modi Government | Mamata Banerjee – केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार दीर्घकाळ टिकणार नसून ते लवकरच कोसळेल. हे सरकार धमक्या देवून करण्यात आले आहे, असा घणाघात तृणमृलच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला.
टीएमसीच्या मेगा ‘शहीद दिन’ रॅलीला संबोधित करताना बॅनर्जी यांनी कोणाचेही नाव न घेता केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारमधील भाजपच्या मित्रपक्षांवर आर्थिक फायद्यासाठी मंत्रिपदाचा त्याग केल्यावरून निशाणा साधला.
ममत बॅनर्जी म्हणाल्या, मोदी सरकारने एनडीएतील मित्रपक्षांना मंत्रिपदांऐवजी पैशाची ऑफर दिल्याचे दिसून येत आहे. ते डरपोक आणि लोभी आहेत. त्यांनी स्वतःच्या अस्मितेला गहाण ठेवले आहे.
यावेळी अखिलेश यादव यांचे कौतुक करताना बॅनर्जी यांनी टिप्पणी केली की, तुम्ही यूपीमध्ये खेळलेला ‘खेल’ भाजप सरकारला (यूपीमध्ये) राजीनामा देण्यास भाग पाडायला हवे होते. परंतु हे सरकार एजन्सी आणि इतर माध्यमांचा गैरवापर करून सत्तेत आले आहे.
भाजपकडे आता बहुमत राहिलेले नाही. एजन्सीचा गैरवापर करून तुम्ही आम्हाला घाबरवू शकत नाही. केवळ बंगालच भारताचे अस्तित्व टिकवू शकतो आणि बंगालशिवाय भारत असूच शकत नाही, असा दावा त्यांनी केला.
मी १० लाख राज्य सरकारी नोकऱ्या देण्यास तयार आहे. तथापि, जेव्हा मी अशा उपक्रमांची घोषणा करण्याचा प्रयत्न करते तेव्हा हे पक्ष त्यांच्या विरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करतात.
काहीवेळा ते रोजगार निर्मिती रोखण्याचा प्रयत्न करतात, तर काही वेळा मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या लाभात अडथळा आणण्यासाठीते प्रयत्न करतात, असा आरोप केला.
तसेच आम्ही त्यांना सुप्रीम कोर्टात कायदेशीर आव्हान देत आहोत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत त्यांची अडवणूक यशस्वी होऊ देणार नाही, असे बंगाल मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील हिंसाचाराच्या अलीकडील घटनांचा स्पष्ट संदर्भ देताना बॅनर्जी म्हणाले, लोकांवर अन्याय करू नका किंवा तो सहनही करू नका. तृणमुलचे कार्यकर्ते दोषी आढळल्यास आम्ही त्यांनाही सोडणार नाही.
टीएमसी कार्यकर्त्यांनी जनतेचे मित्र व्हावे अशी माझी इच्छा आहे. आमच्याकडे काही तक्रार आल्यास आम्ही योग्य ती कारवाई करू. तसेच पोलीस कारवाई करतील. प्रत्येकाला माहीत आहे की जर अन्याय झाला तर आम्ही टीएमसी सदस्यांनाही सोडत नाही, असेही त्या म्हणाल्या.





