“डोनाल्ड ट्रम्पविरोधात बोलण्याचा मोदींमध्ये दम नाही…”; राहुल गांधींचा थेट हल्लाबोल !

Donald Trump | Rahul Gandhi | Narendra Modi – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात बोलण्याचे धाडस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नाही. भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षविराम घडवल्याचा दावा ट्रम्प वारंवार करत आहेत. पण, मोदींमध्ये ट्रम्प खोटे बोलत असल्याचे म्हणण्याइतका दम नाही, असा शाब्दिक हल्लाबोल कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला.
बिहारमधील प्रचार सभेत बोलताना राहुल यांनी प्रामुख्याने मोदी आणि केंद्र सरकारला लक्ष्य केले. मोदींचा अमेरिका दौरा निश्चित झाला होता. मात्र, ते ट्रम्प यांच्या धास्तीपोटी गेले नाहीत, असा दावाही त्यांनी केला. राहुल यांनी निवडणुकांमधील कथित मतचोरीच्या आरोपाचा पुनरूच्चार केला.
मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत मतचोरी करून भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने केंद्रात पुन्हा सरकार स्थापन केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेली राज्यघटना उद्धवस्त करण्याचा प्रयत्न मोदी आणि एनडीए करत आहेत, असे त्यांनी म्हटले.
बिहारमध्ये विरोधकांच्या महाआघाडीला सत्ता मिळाल्यास सर्व समुदायांचे प्रतिनिधित्व असणारे सरकार स्थापन होईल. ते सरकार शेतकरी, मजूर, दलित आणि दुर्बल घटकांचे असेल. केंद्र आणि बिहार सरकारांची धोरणे कामगारविरोधी आहेत. त्यामुळे बिहारमधील तरूणांना रोजगारासाठी इतर राज्यांत जावे लागते. आम्हाला सत्ता मिळाल्यास बिहार केवळ कामगार पुरवणारे राज्य ठरणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.





