मोदींनी सरकारी कंपन्या उध्वस्त केल्या.. त्यामुळे लाखो रोजगार बुडाले ! काँग्रेस नेत्याची पंतप्रधानांवर टीका

नवी दिल्ली – मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात सरकारी मालकीचे सारे उद्योग आणि कंपन्या उद्धवस्त केल्या. त्यामुळे देशातील तरूणांच्या लाखो नोकऱ्या बुडाल्या आहेत असा दावा कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. मोदी सरकारने केलेला मेक ईन इंडियाचा प्रयोग पुर्ण फसला असून हा केवळ सरकारची प्रतिमा उचांवण्यासाठी केलेला प्रयोग होता असेही त्यांनी म्हटले आहे.
“लाखो सरकारी नोकऱ्या हिसकावून, सार्वजनिक कंपन्या बंद पाडणारे नरेंद्र मोदीजी कोणत्या टूलकिटचा भाग आहेत असा सवाल त्यांनी केला आहे. ‘मेक इन इंडिया’चा हाय व्होल्टेज प्रचार केवळ स्वताच्या सरकारची प्रतिमा वाढवण्यासाठी होता, त्यातून देशाला काय मिळाले, असा सवालही त्यांनी केला आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत यावर मोदी सरकारचा विश्वास नाही,असेही त्यांनी म्हटले आहे. मोदी सरकारने बंद पाडलेल्या केवळ सात सार्वजनिक उपक्रमांकडून 3.84 लाख नोकऱ्या रद्द झाल्या आहेत. केंद्र सरकारमध्ये महिलांच्या नोकऱ्या 42 टक्क्यांनी कमी झाल्या असून कंत्राटी आणि कॅज्युअल सरकारी नोकऱ्या 88 टक्क्यांनी का वाढल्या,असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत. खर्गे यांनी सन 2013 ते 2022 या काळात सरकारी कंपन्या कशा बंद पडल्या आणि त्यातील लाखो रोजगार कसे बुडाले याची माहिती देणारा एक व्हिडीओही ट्विटरवर शेअर केला आहे.





