Rahul Gandhi : “जातगणनेसाठी मोदी धास्तीपोटी राजी” – राहुल गांधी

दरभंगा – देशातील वंचितांच्या हितासाठी विरोधक आवाज उठवत आहेत. त्या वंचितांच्या धास्तीपोटी पंतप्रधान नरेंद्र मोदी जातगणना करण्यास राजी झाले, अशी भूमिका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरूवारी मांडली. बिहारच्या दरभंगा जिल्ह्यात राहुल यांनी मिथिला विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी संवाद साधला.
आंबेडकर वसतिगृहात झालेल्या त्या सोहळ्यासाठी प्रशासनाने परवानगी नाकारली होती. त्याचा संदर्भ देऊन राहुल यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला. माझे वाहन अडवण्यात आल्यानंतर मी पायी चालत विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी पोहचलो, असे ते म्हणाले.
मोदी सरकार अंबानी,अदानी यांच्यासारख्या मोजक्या उद्योगपतींच्या हितासाठी कार्यरत आहे. संपूर्ण व्यवस्था केवळ ५ टक्के लोकसंख्येला लाभ मिळावा यासाठी प्रयत्नशील आहे. सरकारमध्ये, उद्योग जगतात दलित, इतर मागासवर्ग आणि आदिवासींना स्थान नाही.
शिक्षण आणि न्यायासाठी तरूणाईने ३ मागण्यांवर संपूर्ण फोकस करावा. तेलंगणाच्या धर्तीवर प्रभावी जातगणना, खासगी शिक्षणसंस्थांमध्ये आरक्षण आणि अनुसूचित जाती-जमातींसाठीच्या निधीचे वितरण अशा त्या मागण्या आहेत.
सत्तारूढ एनडीएकडून कुठली अपेक्षा पूर्ण केली जाणार नाही. मात्र, बिहार असो की केंद्र; आम्ही सत्तेवर आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या हिताची काळजी घेऊ, अशी ग्वाही राहुल यांनी दिली.





