Narendra Modi : इंडोनेशियातल्या कुंभाभिषेकमला मोदींनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडोनेशियातील जकार्ता येथे श्री सनातन धर्म अलायमच्या महा कुंभभिषेगमला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. त्यांनी इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो, मुरुगन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पा हाशिम, व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. कोबलन, तमिळनाडू आणि इंडोनेशियाचे मान्यवर, पुजारी आणि आचार्य, भारतीय वंशाचे सदस्य, या शुभ प्रसंगाचा भाग असलेले इंडोनेशिया आणि इतर देशातील नागरिक तसेच ज्या प्रतिभावान कलाकारांमुळे हे दैवी आणि भव्य मंदिर प्रत्यक्षात आले त्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो अलीकडेच प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला मुख्य अतिथी म्हणून भारतात येऊन गेले. ते भारतीयांचे प्रेम आणि जिव्हाळा सोबत घेऊन इंडोनेशियाला गेले आहेत, याचीही आठवण पंतप्रधानांनी यावेळी करून दिली. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील संबंध केवळ भू-राजकीय नसून हजारो वर्षांच्या सामायिक संस्कृती आणि इतिहासात रुजलेले आहेत”, असे उद्गार पंतप्रधानांनी काढले.
दोन राष्ट्रांमधील बंध वारसा, विज्ञान, दृढ विश्वास, सामायिक श्रद्धा आणि अध्यात्म यावर आधारित आहेत. या संबंधांमध्ये भगवान मुरुगन, भगवान राम आणि भगवान बुद्ध यांचा समावेश आहे. जेव्हा भारतातील भाविक इंडोनेशियातील प्रंबानन मंदिराला भेट देतात तेव्हा त्यांना काशी आणि केदारनाथ प्रमाणेच आध्यात्मिक अनुभूती येते असे त्यांनी सांगितले.
काकाविन आणि सेरात रामायणाच्या कथा भारतातील वाल्मिकी रामायण, कंब रामायण आणि रामचरित मानस सारख्याच भावना जागृत करतात. इंडोनेशियातील रामलीला भारतातील अयोध्या येथे देखील सादर केली जाते. इंडोनेशियातील बोरोबुदुर स्तूप भारतातील सारनाथ आणि बोधगया येथील भगवान बुद्धांच्या शिकवणींचे प्रतिबिंब आहेत, ओदिशातील बाली जत्रा उत्सव प्राचीन सागरी सफरींचा उत्सव साजरा करतो.
या सफरींनी एकेकाळी भारत आणि इंडोनेशियाला सांस्कृतिक आणि व्यावसायिकदृष्ट्या परस्परांशी जोडल होते. जकार्तामधील नवीन भव्य मुरुगन मंदिर शतकानुशतके जुन्या वारशात एक नवीन सुवर्ण अध्याय जोडते यावर त्यांनी प्रकाश टाकला. हे मंदिर श्रद्धा आणि सांस्कृतिक मूल्यांचे एक नवीन केंद्र बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इंडोनेशियातही विविधतेतील एकता…
जकार्तामधील मुरुगन मंदिरात केवळ भगवान मुरुगनच नाहीत तर इतर विविध देवतांचेही वास्तव्य आहे हे लक्षात घेऊन, ही विविधता आणि बहुलता आपल्या संस्कृतीचा पाया आहे. इंडोनेशियामध्ये, विविधतेच्या या परंपरेला भिन्नेका तुंगल इका म्हणतात, तर भारतात, ती विविधतेतील एकता म्हणून ओळखली जाते.
विविधतेच्या या स्वीकृतीमुळेच इंडोनेशिया आणि भारत दोन्ही ठिकाणी विविध धर्माचे लोक परस्पर सुसंवादाने सहजीवन जगतात हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. प्रम्बानन मंदिराचे जतन करण्याचा संयुक्त निर्णय आणि बोरोबुदुर बौद्ध मंदिराप्रती सामायिक वचनबद्धतेवर त्यांनी प्रकाश टाकला. अयोध्येतील इंडोनेशियन रामलीलेचा पंतप्रधानांनी उल्लेख केला.





