Blackout: देशात अनेक ठिकाणी मॉक ड्रिल आणि ब्लॅकआउट, अनेक शहरे बुडाली अंधारात

Blackout: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार देशभरातील 244 जिल्ह्यांमध्ये बुधवारी ‘ऑपरेशन अभ्यास’ अंतर्गत मॉक ड्रिल आणि ब्लॅकआउट सराव आयोजित करण्यात आला. युद्धसदृश आपत्कालीन परिस्थितीत नागरिक सुरक्षा आणि प्रशासकीय तयारी तपासण्यासाठी दिल्ली, गुरुग्राम, शिमला, पटना, सूरत यासह अनेक शहरं काही काळ अंधारात बुडाली.
दिल्लीत रात्री 8 ते 8:15 या वेळेत न्यू दिल्ली म्युनिसिपल कौन्सिल (NDMC) क्षेत्रात ब्लॅकआउट सराव झाला. यामध्ये इंडिया गेट, कॉनॉट प्लेस, लुटियन्स दिल्ली, राष्ट्रपति भवन, संसद भवन, सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय सचिवालयाचा समावेश होता. रुग्णालये, मेट्रो स्टेशन आणि पंतप्रधान निवासस्थान यांना यातून सूट देण्यात आली. खान मार्केट, चांदनी चौक आणि मोटी नगरसारख्या भागातही ब्लॅकआउट पाळण्यात आला.
#WATCH दिल्ली: मॉक ड्रिल के तहत ब्लैकआउट के बाद अक्षरधाम मंदिर में धीरे-धीरे लाइटें जलाई गईं। pic.twitter.com/kfQDJzHC1k
— ANI_HindiNews (@AHindinews) May 7, 2025
गुरुग्राममध्ये उपायुक्त अजय कुमार यांच्या माहितीनुसार, पूर्ण रात्रीसाठी ब्लॅकआउट सराव आयोजित करण्यात आला, ज्यामुळे ‘नो-लाइट झोन’चा अनुभव घेता येईल. शिमलामध्ये सायंकाळी सायरन वाजवून नागरिकांना ब्लॅकआउट सरावाची सूचना देण्यात आली. पटनामध्ये राजभवन आणि मुख्यमंत्री निवासस्थानावर रात्री 7 ते 7:10 दरम्यान ब्लॅकआउट झाला, तर सायरनने लोकांना सतर्क केलं. सूरतमध्येही ब्लॅकआउट सराव यशस्वीपणे पार पडला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊच्या रिझर्व्ह पोलिस लाइन येथे मॉक ड्रिलचं निरीक्षण केलं. त्रिपुरामध्ये सायंकाळी 5:30 ते 5:40 दरम्यान ब्लॅकआउट सराव झाला. या सरावादरम्यान हवाई हल्ल्याचे सायरन, नागरिकांचे स्थलांतर, बंकर तयारी आणि संचार व्यवस्थेची चाचणी घेण्यात आली. गृह मंत्रालयाने नागरिकांना घाबरू नये, सायरन आणि अधिकृत सूचनांचे पालन करावे, असं आवाहन केलं आहे. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी माॅक ड्रील करण्यात आले.
हा सराव 22 एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या तणावग्रस्त वातावरणात आयोजित करण्यात आला. यामुळे देशाची युद्धकालीन तयारी आणि नागरिकांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल, असं गृह मंत्रालयाने म्हटलं आहे.





