Pune : पुणे जिल्ह्यात तीनच ठिकाणी होणार मॉक ड्रिल

पुणे: केंद्र शासनाने सुरक्षेच्या दृष्टीने मॉक ड्रिल घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार बुधवारी जिल्ह्यात विधानभवन (विभागीय आयुक्त कार्यालय), मुळशी पंचायत समिती आणि तळेगाव दाभाडे (ता. मावळ) या तीनच ठिकाणी दुपारी चार वाजता मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये डुडी यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त नागरिकांना मदत आणि मार्गदर्शन पोहोचविण्यासाठी खबरदारी म्हणून ही मॉक ड्रिल आयोजित केली आहे. एखाद्या बिल्डिंगमध्ये आग लागली तर कशा पद्धतीने कार्यवाही करायची हे तपासले जाणार आहे. समजा बॉम्ब हल्ला झाल्यास जखमींना कमीत कमी वेळेत रुग्णालयात दाखल करून उपचार कसे देता येतील हे पाहिले जाणार आहे. मदत करण्यासाठी लागणारा कालावधी कसा कमी करता येईल. यादृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे. तसेच नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, याची माहिती दिली जाणार आहे.
शहरात एकाच ठिकाणी सायरन वाजणार
शहरात सुमारे ७५ ठिकाणी सायरन वाजविण्याची व्यवस्था आहे . येथील सायरन सुरु असल्याची खात्री केली आहे. बुधवारी फक्त विधानभवन येथील एकाच ठिकाणचा सायरन दुपारी चार वाजता वाजणार आहे. सर्वसामान्य नागरिकांनी घाबरून जाऊ नये, आपली दैनंदिन कामे सुरु ठेवावीत, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले.
मॉक ड्रिलमध्ये हे विभाग होणार सहभागी
जिल्हा प्रशासन, आर्मी, एअरफोर्स, पुणे , पिंपरी -चिंचवड महानगरपालिका, पोलिस, अग्निशमन विभाग, आरोग्य या विभागातील प्रत्येकी 15 अधिकारी यांचा समावेश मॉक ड्रिल मध्ये असणार आहे.
जिल्ह्यात ब्लॅक आऊट नाही
केंद्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार ब्लॅक आऊट फक्त मुंबई शहरातील एका भागात होणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात कुठेही ब्लॅक आऊट होणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग
विधानभवन येथील मॉक ड्रिलमध्ये एसीसीचे कॅडेट आणि नेहरु युवा केंद्राचे स्वयंसेवक असे सुमारे 150 विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहे. या विद्यार्थ्यांना यामध्ये ट्रेनिंग दिले जाणार असून त्यानंतर हे विद्यार्थी त्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थांना याचे प्रशिक्षण देतील, अशी माहिती जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली.





