Mobile Addiction : सावधान! ३ बाय ६ इंचाचा डिस्प्ले ठरू शकतोय घातक; ‘लाईक्स’च्या नादात तरुणाईचे भवितव्य धोक्यात?
Mobile Addiction : सोशल मीडियावरील 'वन-वे कम्युनिकेशन'मुळे स्वभावात हट्टीपणा आणि चिडचिड वाढली; तज्ञांनी व्यक्त केली चिंता.

Mobile Addiction – सोशल मीडियामुळे जग जवळ आले आहे. दूरवरच्या माणसांशी असलेला संपर्क वाढला, पण जवळ असलेला माणूस मनाने दुरावत चालला आहे. सोशल मीडियावरील पोस्टवरील कमेंटस्, व्ह्यूज, स्टेटस, लाइक्स यांना अवास्तव महत्त्व दिले जात आहे. या गर्तेत यूजर्स अडकत आहेत. एखाद्या पोस्टला लाइक्स, कमेंटस् न मिळाल्यास तरुणाई निराश होत आहे. या गर्तेत तरुणाई अडकत असून मानसिक आरोग्यासह भवितव्यही काळवंडण्याचे धोके वाढत आहेत.
मोबाइलच्या तीन बाय सहा इंचाच्या डिस्प्लेवर अख्खे विश्व आले आहे. सोशल मीडियामुळे क्रांती झाली असली, तरी हल्ली असंख्य जण त्यातच बुडाल्याचे चित्र आहे. ही बाब मानसोपचार तज्ज्ञांकडे येणाऱ्या रुग्णसंख्येवरून स्पष्टपणे दिसून येत आहे. बहुतांश यूजर्स आभासी जीवनात गुरफटत आहेत. ज्या वयात सकारात्मक विचारांच्या पेरणी गरजेची असते, त्या वयात नकारात्मक भावना, चिंता वाढून सहनशीलता क्षीण होण्याची भीती वाढत आहे.
इतरांनी आपल्याला चांगले म्हणावे, स्तुत्ती करावी, इतररांपेक्षा वेगळे काही तरी करावे, अशी धडपड दिसते. कमी लाइक्स, कमेंटस् मिळाल्या तर निराशा वाढत आहे. व्हच्र्युअल लाइफमुळे स्वमग्रता, एकलकोंडेपणा, निराशा, फसवणूक, आर्थिक नुकसान, विश्वासघात, चिडचिड, चिंता वाढत आहे. वैचारिक क्षमता क्षीण होत असून, समंजसपणाचा अभाव जाणवत आहे; परंतु उज्वल भविष्यासाठी व्हच्युअल लाइफ ‘पेक्षा सोशल लाइफ’ जगण्याची गरज आहे. तरुणांनी मोबाइल गेम्स खेळण्यापेक्षा मैदानी खेळ खेळावेत. त्यातून चिडचिड दूर होईल, शरीर मजबूत होईल.
तज्ज्ञांचे म्हणणे ऐका – डॉ. सोनल जाधव
सोशल मीडियामुळे माणसांचा एकमेकांशी प्रत्यक्ष संवाद कमी होत आहे. परिणामी स्वभावात हट्टीपणा, जिद वाढत आहे. सोशल मीडियावर वनवे’ कम्युनिकेशनमुळे लाइक्स, कमेंट, व्ह्यूज महत्त्वाचे वाटू लागले आहेत. त्यातून स्वतःचे आभासी विश्व तयार करून, लोक त्यात रममाण होत आहे. त्यामुळे सातत्य राखण्याची क्षमता व सहनशीलता कमी होत जाते, असे बुध प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनल जाधव यांनी सांगितले.
प्रसिद्धीसाठी असे स्टंट करू नये – सपोनि संदीप पोमण
सोशल मीडिया प्रसिद्ध होण्यासाठी तरुणाई व्हिडिओ, सेल्फी अपलोड करत आहेत. जीव धोक्यात घालून व्हिडिओ कॉलिंगच्या स्टंटकडे कल वाढला आहे. या आभासी जगात रमल्याने काही जणांनी जीव गमावल्याची उदाहरणे आहेत. तरुणांनी प्रसिद्धीसाठी असे स्टंट करू नये, असे आवाहन पुसेगावचे सपोनि संदीप पोमण यांनी केले आहे.





