राज ठाकरेंवरील सुषमा अंधारेंच्या टीकेला मनसेकडून प्रत्युत्तर; राजू पाटील म्हणाले,”आमच्याकडे एक ‘सुशी ताई’ आहेत ज्यांच्या…”,

मुंबई : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. यानंतर आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. राजू पाटील यांनी सुषमा अंधारेंना ‘सुशी ताई’ म्हटलं तसेच ‘वरचा मजला रिकामा’ या मराठी वाक्प्रचाराचा वापर करत टीका केली.
राजू पाटील यांनीसुषमा अंधारेंवर टीका करत ट्वीट केले आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही हे ट्वीट रिट्वीट करण्यात आले आहे. राजू पाटील म्हणाले, “मराठीत ‘वरचा मजला रिकामा’ असा वाक्प्रचार आहे, परंतु आमच्याकडे एक ‘सुशी ताई’ आहेत ज्यांच्या ‘वरच्या मजल्यावर’ घनदाट ‘अंधार’ आहे.”
“आपण कधीकाळी कुणाविषयी काय बोललो होतो, हे त्यांना बिलकुल आठवत नाही आणि त्याच अंधारामुळे त्या वाट्टेल ते बरळत असतात,” अशी टीका राजू पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केली.
दरम्यान, सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंविषयी बोलताना, “आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे त्याचा ‘उठ दुपारी आणि घे सुपारी’ असाच कार्यक्रम असतो. ‘उठ दुपारी, घे सुपारी’ असं करताना ते अचानक गुहेतून बाहेर येतात, अचानक सभा घेतात आणि परत गायब होतात. परत ते पुढच्या निवडणुकीलाच येतात.”असे म्हटले होते.
तसेच “दोनच मुद्दे मांडा, पण व्यवस्थित मांडा ना. मी यालाही थोडं बोलेन, त्यालाही थोडं बोलेन, मी मध्येच विचारवंत होईन, मध्येच मिमिक्री आर्टिस्ट होईन, मी मध्येच पेंटर होईन, मध्येच आणखी काही होईन आणि मी काहीतरी बोलेन आणि लोक काहीतरी समजतील, असं यांचं सुरू असतं,” असं म्हणत सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंवर टीका केली.
सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “खरंतर मला त्या माणसावर बोलावंसं वाटत नाही. आमचे देवेंद्र भाऊ किती छान बोलतात. मला आमचे देवेंद्र भाऊ आवडतात. कारण त्यांना माझ्यापेक्षा चांगलं सुचतं.”
“ते म्हणाले की, मतदार नसलेली सेना. मतदार नसलेली सेनाचा शॉर्टफॉर्म करा आणि काय होतं पाहा. मतदारमधील ‘म’, नसलेलीमधील ‘न’ आणि सेनेमधील ‘से’ काढला की काय होतं? मी काहीच म्हणत नाही. मी अतिशय गरीब लेकरू आहे, त्यात अजिबात पडत नाही,” असे अंधारे यांनी म्हटले. “आता मतदार नसलेल्या सेनेचा उमेदवार नसलेली सेना इथपर्यंत प्रवास झाला आहे. अशी परिस्थिती होऊनही त्यांना बोलावंसं वाटतं,” असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.





