मनसेचा समीर वानखेडेंना पाठिंबा?; ‘या’ दोन शब्दांच्या ट्विटमधून दिला सूचक इशारा

मुंबई : मुंबईतील क्रूज पार्टी प्रकरणाने राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या प्रकरणामुळे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक विरुद्ध समीर वानखेडे यांचा सामना रंगला असल्याचे दिसत आहे. तर एनसीबीच्या कारवाईचे समर्थन भाजपकडून करण्यात येत आहे. यासर्व घडामोडीमध्ये एक ट्विट सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे.
"वानखेडे"ला शुभेच्छा!! pic.twitter.com/NvJdLSLeH6
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 30, 2021
मुंबई ड्रग्स प्रकरणात गंभीर आरोपांमुळे अडचणीत आलेल्या समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ आता मनसेने एक पाऊल पुढे टाकले असल्याचे दिसत आहे. लिटील मास्टर सुनील गावसकर यांच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला ५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) वतीने काल वानखेडे स्टेडियवर विशेष कार्यक्रम पार पडला होता. त्या कार्यक्रमाचा फोटो शेअर करत मनसे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांनी ‘वानखेडेला शुभेच्छा’ असे सूचक ट्विट केले आहे. केवळ दोन शब्दांच्या या सूचक ट्विटमधून या प्रकरणातील आपली भूमिका मनसेने स्पष्ट केली असल्याचे म्हटले जात आहे.
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि त्यांची बहीण जास्मिन वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यास सुरुवात केल्यावर मनसेच्या पदाधिकारी असलेल्या जास्मिन वानखेडे यांचा मनसेने बचाव केला होता. तसेच जास्मिन वानखेडे या आमच्या पक्षात काम करतात याचा अभिमान आहे, असे मनसे नेते अमेय खोपकर यांनी म्हटले होते. दरम्यान, मनसेने आता वानखेडेंबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे या प्रकरणावूरन पुढच्या काळात मुंबईतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.





