धक्कादायक ! अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या तरुणाचा मृत्यू

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या जय मालोकार या तरुणाचा मृत्यू झाला आहे. जय मालोकर याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. जय मालोकार हा मनसे कार्यकर्ता आहे. अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली होती. ही टीका जिव्हारी लागल्याने मनसे कार्यकर्त्यांनी अकोल्यात अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला होता. जय मालोकरच्या अचानक जाण्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
काय घडले होते?
अमोल मिटकरी अकोल्यातील शासकीय विश्रामगृहात आले होते, याची माहिती मिळताच मनसे कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहात धडक दिली. मिटकरी थांबलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या खोलीत शिरण्याचा प्रयत्न मनसे कार्यकर्त्यांनी केला, मात्र मिटकरींच्या समर्थकांनी आणि पोलिसाने या सर्वांना रोखून धरलं. यानंतर या कार्यकर्त्यांनी अकोल्यातील शासकीय विश्रामगृहात पार्क करण्यात आलेल्या अमोल मिटकरींच्या कारला लक्ष केले. झाडाची कुंडी आणि मोठे दगड टाकत अमोल मिटकरींच्या कारची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली, यात मिटकरींच्या कारचं नुकसान झालं. या राड्यात जय मालोकरचा समावेश होता.
तोफोडीनंतर काय झाले?
या राड्यानंतर जय मालोकरला अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यामुळे जयला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.जय मालोकार हा 28 वर्षांचा होता. त्याला आज दुपारच्या राड्यानंतर अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्याच्या छातीत अचानक दुखू लागलं होतं. यानंतर त्याला अकोल्यातली रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जय मालोकार याला हृदय विकाराचा झटका येईल, अशी कुणाला कल्पना नव्हती. पण जय मालोकारला हृदय विकाराचा तीव्र झटका आला त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.





