अमित ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यादरम्यान मनसेला धक्का ! पदाधिकाऱ्यांसह माजी नगरसेवक शिंदे गटात

नाशिक – आगामी महानगरपालिकांच्या दृष्टीने राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसायला सुरुवात केली आहे. शिंदे गटाने आता ठाकरे गटासह मनसेलाही धक्का दिला आहे. नाशिकच्या मनसेच्या माजी नगरसेवकाने प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिंदे गटात प्रवेश केला असल्याचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. विशेष म्हणजे मनसे नेते अमित ठाकरे यांचा सध्या नाशिक दौरा सुरु आहे अशात मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे.काही दिवसांपासून मनसे आणि भाजप युतीच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. परंतु आता नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का बसल्याचे समोर आले आहे. भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिंदे गटामध्ये मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह माजी नगरसेवकाने प्रवेश केला असल्याचे समोर आले आहे.
ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे. अमित ठाकरे हे सध्या पक्षबांधणीसाठी नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे राज ठाकरे हे देखील पुण्यातील कार्यकर्त्यांच्या आज भेटीगाठी घेणार आहेत. त्यासोबत राज ठाकरे सहजीवन व्याख्यानमालेत देखील सहभागी होणार आहेत.





