Sanjay Raut : कोणतीही अघोरी शक्ती आली तरी…, ठाकरे बंधूंची एकजूट; मनसे-शिवसेना एकत्र लढणार

नाशिक : मराठी माणसांच्या स्वाभिमानासाठी आणि महाराष्ट्राच्या हक्कांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत मोठं वक्तव्य करत मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली आणि इतर महापालिकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचं जाहीर केलं आहे.
यासोबतच त्यांनी भाजपा, नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करताना महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा डाव” असल्याचा आरोप केला आहे.
ठाकरे बंधूंची एकजूट
संजय राऊत म्हणाले की, “कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची वज्रमूठ तोडू शकत नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसांच्या एकजुटीची ताकद आहे. आम्ही मुंबई महापालिका एकत्र लढून जिंकणार आहोत. नाशिक, ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह इतर अनेक महापालिकांमध्येही आम्ही एकत्र लढणार आहोत. याबाबत आमची चर्चा सुरू आहे. राऊत यांनी ठाकरे बंधूंच्या या एकजुटीला मराठी माणसाचा स्वाभिमान असं संबोधत भाजपावर आणि एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार हल्ला चढवला.
भाजपावर जोरदार टीकास्त्र
राऊत यांनी भाजपावर महाराष्ट्राला दुर्बळ करण्याचा डाव असल्याचा थेट आरोप केला. ते म्हणाले, नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्ती मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला नामर्द करण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठी माणसांनी स्वाभिमानासाठी लढू नये, असा त्यांचा डाव आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, स्वातंत्र्यानंतर देशाने अनेक क्षेत्रांत प्रगती केली, पण २०१४ नंतर देश खड्ड्यात गेला. भाजपाने धार्मिक देशाला धर्मांध केलं, आणि ही धर्मांधता देशाच्या स्वातंत्र्याला धोकादायक आहे.” राऊत यांनी भाजपावर राजकीय स्वार्थासाठी धार्मिक तणाव निर्माण केल्याचा आरोप केला
ठाकरे बंधूंची रणनीती
संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंच्या एकजुटीवर जोर देताना सांगितलं, “काय खायचं, काय प्यायचं आणि तलवार कशी उपसायची, हे मराठी माणसांना माहीत आहे. ही तलवार ठाकरे बंधूंनी उपसली आहे, आणि महाराष्ट्राची मर्दानगी आता उसळून येईल. त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, मुंबई महापालिका, ठाणे, नाशिक, आणि कल्याण-डोंबिवली येथील निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय जवळपास निश्चित आहे. जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही दोन्ही पक्ष एकत्र लढतील. राऊत म्हणाले, “महापालिकांबाबत आमचं ठरलं आहे. यावर जास्त चर्चा करून वेळ वाया घालवणार नाही.





