MNS Pimpri Chinchwad: स्मार्ट मीटर सक्तीवर मनसे आक्रमक; महावितरणला ‘मनसे स्टाईल’ खळखट्याकचा इशारा
MNS Pimpri Chinchwad: महावितरणला ७ दिवसांचा अल्टिमेटम; कायदेशीर प्रश्नांची उत्तरे न दिल्यास महावितरण कार्यालयांवर तीव्र आंदोलन छेडण्याचा मनसेचा पवित्रा.

MNS Pimpri Chinchwad – महावितरणकडून पिंपरी-चिंचवड शहरातील वीज ग्राहकांना पाठवल्या जाणाऱ्या ‘स्मार्ट मीटर’च्या मेसेजनंतर शहरात संतापाचे वातावरण पसरले असून या सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली आहे. शहरातील नागरिकांना ‘४८ तासांत तुमचे सध्याचे मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्यात येईल’ असा अधिकृत मेसेज प्राप्त झाल्यानंतर नागरिकांच्या शेकडो तक्रारी मनसेकडे आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या या मोहिमेला विरोध केला असून, ग्राहकांच्या संमतीशिवाय परस्पर मीटर बदलण्याचा प्रयत्न केल्यास जागेवरच ‘मनसे स्टाईल’ने खळखट्याक केले जाईल, असा थेट इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. या संदर्भात मनसे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष राजू सावळे यांनी सांगितले की, मनसेच्या शिष्टमंडळाने महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांची रास्तापेठ येथील कार्यालयात भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग आणि विद्युत कायदा,
२००३ च्या ग्राहक संरक्षण नियमांनुसार, ग्राहकाला विश्वासात न घेता किंवा त्याच्या लेखी आक्षेपाची दखल न घेता कोणतीही नवीन यंत्रणा सक्तीने लादता येत नाही, याकडे मनसेने लक्ष वेधले आहे. शहरातील सर्व विद्यमान मीटर पूर्णपणे कार्यरत आणि अचूक असताना, प्रचलित नियमांचे उल्लंघन करून मीटर बदलण्याची चालवलेली घाई बेकायदेशीर आहे. यापूर्वी मनसेने पाठवलेल्या कायदेशीर पत्राला कोणतेही लेखी उत्तर न देता किंवा शंकांचे निरसन न करता महावितरणकडून पुन्हा केवळ ऑटोमेटेड मेसेज पाठवले जात असल्याने,
ही कृती ग्राहक अधिकारांचे थेट उल्लंघन करणारी असल्याचा आरोप मनसेने केला आहे. जोपर्यंत नागरिकांची आणि सोसायट्यांची अधिकृत परवानगी मिळत नाही, तोपर्यंत पिंपरी-चिंचवड शहरात एकही स्मार्ट मीटर बसवण्याचे काम करू नये. या विरोधानंतरही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी किंवा कंत्राटदारांनी जबरदस्तीने मीटर बदलण्याचा प्रयत्न केल्यास, ते गृहअतिक्रमण मानले जाईल. मनसेने याविरोधात विद्युत लोकपाल आणि ग्राहक न्यायालयात दाद मागेल.
तसेच महावितरणने या तक्रारीची दखल घेऊन पुढील ७ दिवसांत आपला निर्णय लेखी स्वरूपात कळवावा, अन्यथा महावितरण कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. यावेळी शहराध्यक्ष सचिन चिखले, पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष राजू सावळे, रूपेश पटेकर, बाळा दानवले, तसेच विधानसभा अध्यक्ष मयुर चिंचवडे उपस्थित होते. निवेदनाची प्रत महावितरणचे पिंपरी विभागाचे कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे व भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता लहाने यांनाही माहितीस्तव देण्यात आली.






