मनसे नेत्यांची धरपकड सुरु; मुंबईतील बड्या नेत्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याप्रकरणी 4 मे चा अल्टिमेटम दिला आहे. भोंगे उतरवले नाहीत तर मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवण्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून पोलिसांनी मनसे नेते, पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरु केली आहे. पोलिसांनी मुंबईतील विभागप्रमुख महेंद्र भानुशाली यांना ताब्यात घेतले आहे. भानुशाली यांनी सर्वात आधी राज ठाकरे यांच्या आवहनानंतर भोंग्यावर हनुमान चालिसा वाजवली होती. त्यांना मुंबईतील घाटकोपरमधून ताब्यात घेण्यात आले आहे.
दुसरीकडे, औरंगाबादेतील सभेत भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्याविरूद्ध औरंगाबादच्या सीटी चौक पोलिस स्टेशनमध्ये गन्हा दाखल करण्यात आला आहे. 153, 116, 113, 135 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यासह राजीव जवळेकर आणि इतर आयोजकांवर गुन्हा दाखल झालाय. राज यांच्या सभेसाठी पोलिसांनी 16 अटी घालून दिल्या होत्या त्यापैकी 12 अटींचे त्यांच्या भाषणात उल्लंघन झाले असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. ताज्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्याविरूद्ध अटक वाॅरंट निघाले असून त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव मनसेच्या अनेक नेत्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यानंतर बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, गजानन काळे या बड्या नेत्यांसह अनेक नेते नाॅटरिचेबल झाले आहेत. राज ठाकरे यांनी नेते, पदाधिकाऱ्यांना भूमिगत होण्याचे आदेश दिल्याची माहितीही समोर आली आहे.





