“मनसे ही भाजपची बी टीम”; आदित्य ठाकरेंचा पुन्हा एकदा राज ठाकरेंवर निशाणा

Aaditya Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने मुंबईत मराठी बोललंच पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. यासाठी मनसैनिकांनी थेट बँकेत जाऊन जे कर्मचाऱ्यांनी मराठीत बोलायला नकार दिला, त्यांना मारहाण देखील केली. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेने थेट उत्तर भारतीयांसाठी ‘मराठी पाठशाला’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. कांदिवलीमधील मराठी पाठशाला कार्यक्रमात बोलताना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपसह मनसेवर देखील हल्लाबोल केला.
नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की, “जेव्हा देशात कोरोनाचं संकट आलं होतं. तेव्हा अनेकांना आपल्या घरी जायचं होतं. तेव्हा उत्तर भारतीयांचे हाल झाले. अनेक जण रस्त्याने पायी गेले. मात्र, तेव्हा केंद्राने किंवा यूपी, बिहार सरकारने तुमचा आवाज ऐकला नाही. तर तेव्हा उद्धव ठाकरेंनी तुमचा आवाज ऐकला. त्या संकटाच्या काळाच ते म्हणाले होते की, तुम्ही घाबरून जाऊ नका हे पण तुमचंच गाव आहे. त्यावेळी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी कोणालाही आत येऊ देऊ नका असे आदेश दिले होते.” Aaditya Thackeray |
“बरेच लोक मुंबईला त्यांच्या कामाचे ठिकाण आणि मराठीला त्यांची मातृभाषा मानतात. पण प्रत्येकाला त्यांची मातृभाषा माहीत असली पाहिजे. तुम्ही ज्या राज्यात जाल त्या राज्यातील लोकांचा आदर केला पाहिजे, आणि तुम्हाला तिथली भाषा अवगत असली पाहिजे,” असं यावेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. Aaditya Thackeray |
“मराठीची पाठशाळा हा एक चांगला कार्यक्रम आहे. तो केवळ कांदिवलीमध्येच नाही तर संपूर्ण मुंबईत सुरू झाला आहे. मराठीचा अपमान करणाऱ्यांना त्याची प्रतिक्रिया मिळतेच, पण ज्यांना मराठी शिकायचे आहे, त्यांच्यासाठी मी एक शाळा घेतली आणि या उपक्रमात मी त्यांचे मनापासून स्वागत करतो,” असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी मनसे आणि भाजपवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. “मनसे ही भाजपची बी टीम आहे, भाजप आणि मनसेची सेटिंग आहे. सेटिंग करणारे आहेत, त्यांना मी उत्तर देत नाही,” अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. Aaditya Thackeray |
हेही वाचा:
अमित शाहांकडून शिवरायांचा एकेरी उल्लेख, औरंगजेबाच्या कबरीला समाधीचा दर्जा; संजय राऊतांचा हल्लाबोल





