‘मराठ्यांना संपवायला निघालेला औरंगजेब इथे गाडला गेलाय’; कबरीच्या मुद्यावर राज ठाकरे म्हणाले…

Raj Thackeray Speech | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केले. काही दिवसांपूर्वी राज्यात चर्चेत राहिलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावर देखील त्यांनी मत व्यक्त केले. तिथे फक्त कबर ठेवा, ही सजवलेली कबर काढून का, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, ‘मराठ्यांना संपवायला आलेल्या औरंगजेबला इथे गाडलाय’ असा बोर्ड कबरीच्या इथे लावावा, असे ते म्हणाले.
औरंगजेबाच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर खरंतर औरंगजेबाने आग्र्याला परत जायला होते पण असं झालं नाही. तो इथे का थांबलात्याला माहिती होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आहे, पण का ठाण मांडून बसला होता? शिवाजी महाराज तर गेले होते, त्याला शिवाजी महाराजांचा विचार मारायचा होता. जो त्याला जमला नाही. सगळे प्रयत्न केले, इथे शेवटी मेला.
‘जगाच्या इतिहासात औरंगजेब वाचला जातो. त्याचा अभ्यास केला जातो. ज्यावेळेला त्याचा अभ्यास केला जातो त्यावेळी जगभरातील लोकांना कळतं की, तो काय करायला गेला होता आणि कसा मेला? तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं जगभरात नाव येतं.’
‘औरंगजेबची ती सजवलेली कबर काढा. त्या ठिकाणी नुसती कबर दिसली पाहिजे. त्या ठिकाणी मोठा बोर्ड लावा. आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेलाय. हा आमचा इतिहास.’, असे म्हणत त्यांनी कबरीच्या मुद्यावर मत व्यक्त केले.
राज ठाकरे पुढे म्हणाले, अफजाल खान इथे आला, प्रतापगडाखाली मारला गेला, तिथेच त्याची कबर खोदली गेली. इथेच त्याला पुरले. मराठीत फार अप्रतिम शब्द आहे ना, पुरुन उरेन ते आहे. अफजल खानाला तिथे पुरला त्याला शिवाजी महाराजांच्या परवानगीशिवाय पुरला नसले. महाराजानी सांगितलं असेल निश्चित करा. जगाला कळू दे कुणाला मारलं आहे. आपण मराठ्यांनी ज्यांना गाडलं आहे, त्यांची प्रतिकं नेस्तनाबूत करुन चालणार नाही.
औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे की पाडली पाहिजे? हे विषय आत्ताच कसे आले? चित्रपटाने जागे होणारे हिंदू काहीही कामाचे नाहीत. चित्रपट उतरला की हे उतरले. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आता कळलं का? अक्षय खन्ना चित्रपटात औरंगजेब बनून आल्यानंतर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला का?, असा सवाल देखील त्यांनी केला




