मोठी बातमी ! मनसेकडून विधानसभेसाठी दोन उमेदवारांची नावे जाहीर ; राज ठाकरेंची घोषणा

MNS Assembly Election । राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील प्रत्येक पक्ष तयारीला लागला आहे. त्यातच सर्व पक्ष योग्य उमेदवाराच्या शोधात असल्याचे दिसत आहे. मात्र या स्पर्धेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आघाडी घेतलीय. कारण मनसेकडून विधानसभेसाठी दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी राज ठाकरे यांनी मनसेचे विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवार जाहीर केले. याबाबत मनसेने पत्रकदेखील प्रसिद्ध केलंय.
बाळा नांदगावकर, दिलीप धोत्रे यांना उमेदवारी MNS Assembly Election ।
मनसेने दक्षिण मुंबईतील शिवडी विधानसभेसाठी पक्षाचा निष्ठावंत चेहरा बाळा नांदगावकर यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे. तर दुसरीकडे पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदावादी जाहीर केली. सध्या शिवडी विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाचे अजय चौधरी, तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे समाधान अवताडे विद्यमान आमदार आहेत.
पक्षाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार,”मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा – नवनिर्माण यात्रा सुरु असून आज सोमवार सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे मा.राजसाहेब ठाकरे यांनी मनसेच्या खालीलप्रमाणे दोन विधानसभा उमेदवारांची घोषणा केली आहे.
1. शिवडी विधानसभा : बाळा नांदगांवकर
2. पंढरपूर विधानसभा : दिलीप धोत्रे
शिवडी विधानसभा मतदारसंघ हा दक्षिण मुंबईतील महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात सध्या अजय चौधरी विद्यमान आमदार आहेत. अजय चौधरी हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत. अजय चौधरी हे 2014 आणि 2019 असे दोनवेळा निवडून आले आहेत. 2014 मध्ये अजय चौधरी यांनी बाळा नांदगावकर यांचा पराभव केला होता. तर 2019 मध्ये अजय चौधरी यांनी मनसेच्याच संतोष नलावडे यांचा पराभव करुन, दुसऱ्यांदा विधानसभेवर ठाकरेंचा झेंडा फडकवला होता.
शिवडी मतदारसंघातूनच बाळा नांदगावकर चार वेळा आमदार MNS Assembly Election ।
शिवसेनेत असताना मांझगाव विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा (1995-2004) आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर ते शिवडी मतदार संघातून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. एकेकाळी कट्टर शिवसैनिक असलेले बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांच्या मनसे पक्षात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांचं शिक्षण दहावीपर्यंत झालं आहे.





