Election Commission : ‘मनसे आणि मविआ’च्या नेत्यांनी घेतली निवडणूक आयोगाची भेट

Election Commission – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील गोंधळ, निवडणूक आयोगाचा कारभार आणि मतदार नोंदणी प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे. यातील एक शिष्ट मंडळ सीईओंच्या भेटीला गेले आहे.तर, दुसरे शिष्टमंडळ अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात भेटून आले आहे.
या बैठकीमध्ये महाविकास आघाडीसह राज्यातील इतर विरोधी पक्षातील प्रमुख नेते देखील उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना(उबाठा)नेते उद्धव ठाकरे , मनसेप्रमुख राज ठाकरे, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात,अनिल देसाई, अनिल परब, जयंत पाटील यांच्यासह विरोधी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली .
या बैठकीत विविध नेत्यांनी निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींबाबत थेट प्रश्न उपस्थित करत निवडणूक आयोगावर रोष व्यक्त केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्दे उपस्थित केले. उद्धव ठाकरेंनी मतदान कुणाला जाते हेच कळत नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.
तसेच, उद्धव ठाकरे यांनी मतदार यादीतील गोंधळावर नाराजी व्यक्त केली आहे. देशात आता कुठेच निवडणुका नाहीत तर व्हीव्हीपॅट आणा, अशी मागणी देखील त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात प्रमुख मुद्दे उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल सामान्यांच्या मनात खूपच शंका आहे.
खरंच निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे याची शंका उत्पन्न होत आहे, लोकसभा,विधानसभेला किती मतदार वगळले त्याचा तपशील का मिळत नाही?, एखाद्या व्यक्तीचे नाव का काढले गेले ते त्याला का सांगितले जात नाही?, निवडणूक आयोगाने नावे, त्याचा पूर्ण तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करावा, ,असे विविध प्रश्नांबाबत शंका उपस्थित केली आहे.
बैठकीत उपस्थित केलेले प्रश्न :
देशात आता कुठेच निवडणुका नाहीत तर व्हीव्हीपॅट आणा – उद्धव ठाकरे
मतदान कुणाला जाते हे कळत नाही – उद्धव ठाकरे
विरोधकांचे प्रश्न केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवणार – आयोग
निवडणूक लागलेली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली ? – राज ठाकरे
जे आज १८ वय पूर्ण करत आहे, त्यांनी मतदान करू नये का ? – राज ठाकरे
३१ जानेवारी पर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश आहेत. तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का ? – राज ठाकरे
दोन दोन ठिकाणी मतदारांचे नाव – राज ठाकरे
वडिलांचे वय मुलाच्या वयापेक्षा कमी – राज ठाकरे
राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा, सविस्तर चर्चा होईल – राज ठाकरे
आमच्याकडून दिल्लीला आणि महाराष्ट्र आयोगाला पत्र दिले होते. आयोग म्हणते की पत्रच आले नाही. अनेक घरे अशी आहे जी अस्तित्वात नाही, पण तिथे मतदार आहेत – राष्ट्रवादी नेते जयंत पाटील
एखादे सॉफ्टवेअर वापरुन दुबार मतदार यादीतून बाहेर काढा– नेते जयंत पाटील
मतदार यादींमध्ये दुरुस्ती करुन निष्पक्ष मतदान घेतले जावे. आम्ही काही दिवसांत तुम्हाला काही पुरावे देणार असून खोटे मतदार हे लाखांच्या घरात असल्याचा दावा – नेते जयंत पाटील





