MNGL Gas Connection – शहरातील प्रभात रस्ता आणि लॉ कॉलेज रस्ता परिसरातील नागरिक सध्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीच्या मुजोर कारभारामुळे आणि केंद्र सरकारच्या फर्मानामुळे संकटात सापडले आहेत. गेल्या चार वर्षांपासून रस्ते खोदून पीएनजी गॅसची पाइपलाइन टाकली; पण आजही घराघरांत गॅस पोहोचलेला नाही. एकीकडे सेवा देण्यात कंपनी पूर्णपणे अपयशी ठरली असताना, दुसरीकडे पीएनजी कनेक्शन न घेतल्यास सिलिंडर बंद करू अशी धमकीवजा सक्ती केंद्राने केल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. प्रभात रस्ता आणि लॉ कॉलेज परिसरात चार वर्षांपूर्वीच पाइप नॅचरल गॅसची मुख्य वाहिनी टाकण्यात आली. कंपनीने मोठमोठे दावे केले. मात्र, प्रत्यक्षात रहिवाशांना कनेक्शन मिळालेले नाही. वारंवार पाठपुरावा करूनही काम सुरू आहे, यापलीकडे उत्तर मिळत नाही. मुळात पाइपलाइन असूनही कनेक्शन न देणे, हा ग्राहकांच्या हक्कांवर गदा आणणारा प्रकार असून, एमएनजीएलचे सर्व दावे आता फोल ठरले आहेत. जर एमएनजीएलला सेवा देता येत नसेल, तर त्यांनी जाहिरातींचे ढोल बडवणे थांबवावे. आधी कनेक्शन द्या आणि मगच सक्तीची भाषा करा,’ अशा शब्दांत ज्येष्ठ नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला आहे. जर येत्या काही दिवसांत कनेक्शन देण्याचे काम सुरू झाले नाही, तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे. एमएनजीएल गॅस कनेक्शन तयारी पूर्ण मात्र गॅसच नाही परिसराची पाहणी केली असता, रस्त्यांच्या कडेला एमएनजीएल गॅस लाइन असे मिरवणारे पिलर मोठ्या थाटात उभे असल्याचे दिसतात. मात्र, दुर्दैवाची बाब अशी, की या पिलरखालून गेलेल्या पाइपलाइनमधून गेल्या चार वर्षांत गॅस सोसायट्यांपर्यंत पोहोचलेला नाही. या भागातील अनेक सोसायट्यांनी पीएनजी कनेक्शन मिळवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेत सर्व तांत्रिक तयारी पूर्ण केली आहे. रहिवाशांनी पदरमोड करून घराघरांत अंतर्गत पाइपलाइनची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. मात्र, एमएनजीएलने मुख्य वाहिनीतून या सोसायट्यांना कनेक्शन न दिल्याने ही सर्व यंत्रणा धूळखात पडली आहे. आम्ही आमची जबाबदारी पार पाडली; पण एमएनजीएलचे अधिकारी नक्की झोपलेत, की त्यांना ग्राहकांचे काही सोयरसुतक नाही, असा जळजळीत सवाल रहिवासी विचारत आहेत. केंद्राची धमकी आणि जीव टांगणीला! एकीकडे एमएनजीएल सेवा देत नाही आणि दुसरीकडे केंद्र सरकारने अजब परिपत्रक काढून ज्या भागात पीएनजी लाइन गेली आहे, तिथे पीएनजी घेणे सक्तीचे आहे; अन्यथा एलपीजी सिलेंडर बंद करू, असा इशारा दिला आहे. हक्काची सेवा मिळत नाही आणि जुनी सेवा बंद करण्याची धमकी दिली जातेय, ही कसली लोकशाही. असा जळजळीत सवाल या परिसरातील रहिवासी विचारत आहेत. या दुहेरी कात्रीत सापडलेल्या नागरिकांत सध्या गोंधळ आणि भीतीचे वातावरण आहे.