पुणे | आमदार शिरोळे यांचा पदयात्राने अर्ज दाखल

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महायुतीतील सर्व पक्षांच्या ऐक्याचे शक्तिप्रदर्शन करत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केला. सकाळी नऊ वाजता शिवाजीनगरचे ग्रामदैवत श्री रोकडोबाचे दर्शन घेऊन शिरोळे यांनी अर्ज दाखल केला.
श्री रोकडोबा मंदिरापासून शिरोळे यांनी पदयात्रेला सुरुवात केली. अमराळे दवाखाना, शिरोळे गल्ली, गणपती चौक मार्गे मॉडर्न शाळा, पुढे जंगली महाराज मंदिरावरून बालगंधर्व चौकात ही पदयात्रा आली. त्यानंतर घोले रस्ता मार्गे पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे जाऊन अर्ज दाखल केला.
या वेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, गणेश बीडकर, राजेश पांडे, अमोल बालवडकर आदी उपस्थित होते. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी महायुती कटिबद्ध असून, मतदारांच्या विश्वासास पात्र ठरेल आणि महायुतीचे पुण्यातील सर्वच उमेदवार विजयी होतील, असा विश्वास खा. मोहोळ यांनी व्यक्त केला.
शिवाजीनगर मतदारसंघासाठी आमदार म्हणून सिद्धार्थ शिरोळे सतत पाच वर्षे कार्यरत राहिले. वाड्या-वस्त्यांवरही त्यांनी संपर्क ठेवला, असे मोहोळ म्हणाले. ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिरोळे यांना शुभेच्छा दिल्या.
पदयात्रेमध्ये महायुतीतर्फे दीपक मानकर, दत्ता खाडे, बाळासाहेब बोडके, अभिषेक बोके, संजय डोंगरे, रमेश ठोसर, युवराज शिंगाडे, तम्मा विटकर पदयात्रेत सहभागी झाले होते.




