पुण्यात आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ला; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

पुणे : सांगलीतील शेतकऱ्यांच्या १० म्हशी जबरदस्तीने गोशाळेत नेल्याच्या प्रकरणावरुन पुण्यातील फुरसुंगी येथील द्वारकाधीश गोशाळेजवळ आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर गोरक्षकांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत गोरक्षकांनी खोत यांना धक्काबुक्की करत आक्रमक पवित्रा घेतला. शेतकऱ्यांच्या जनावरांना परत मिळवण्यासाठी गेलेल्या खोत यांना गोरक्षकांनी विरोध केला आणि त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली, असा आरोप होत आहे.
नेमकं काय घडलं?
दोन महिन्यांपूर्वी सांगलीतील शेतकऱ्यांच्या १० म्हशी आणि त्यांच्या ११ पाडसांना गोरक्षकांनी फुरसुंगीच्या द्वारकाधीश गोशाळेत जबरदस्तीने नेल्याचा आरोप आहे. शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली असता, न्यायालयाने म्हशी परत करण्याचे आदेश दिले. मात्र, शेतकरी गोशाळेत गेले असता, तिथे म्हशी नसल्याचे आढळले. गोशाळेच्या व्यवस्थापकांनी “म्हशी डोंगरावर चरायला सोडल्या असता त्या पळून गेल्या,” अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे शेतकऱ्यांची दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सदाभाऊ खोत यांचे गंभीर आरोप –
या प्रकरणी बोलताना आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, “राज्यात गोवंश संरक्षण कायद्याचा दुरुपयोग करत शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे. दुधाळ जनावरे विकायला गेलेल्या शेतकऱ्यांना मारहाण करुन त्यांची जनावरे जबरदस्तीने गोशाळेत नेली जातात. तिथे जनावरांच्या देखभालीसाठी २०० ते ५०० रुपये प्रतिदिन आकारले जातात. न्यायालयीन निर्णयाला वर्ष-दीड वर्ष लागले तर शेतकरी दंडाची रक्कम भरु शकत नाही, परिणामी जनावरे माघारी घेतली जात नाहीत. साताऱ्यातील कोरेगाव येथील १० म्हशी आणि ११ पाडसे याच गोशाळेत आणली होती. आम्ही ती तपासण्यासाठी आलो असता गोरक्षकांनी आम्हाला धक्काबुक्की केली.”
गोरक्षणाच्या नावाखाली लॉबी?
सदाभाऊ खोत यांनी गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी कार्यरत असल्याचा गंभीर आरोप केला. ते म्हणाले, “या लॉबीची कॉर्पोरेट कार्यालये आहेत आणि शेतकऱ्यांना त्रास देण्याचे काम सुरु आहे. सरकारने यावर लक्ष घालून कारवाई करावी. जर गोरक्षकांवर कारवाई झाली नाही, तर आम्ही पोलीस स्टेशनसमोर जनावरांच्या छावण्या उभ्या करु,” असा इशारा त्यांनी दिला होता. याच वक्तव्यामुळे गोरक्षक आक्रमक झाल्याचे दिसून आले.
सरकार आणि प्रशासन यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.





