आमदार रवी राणांसह 16 कार्यकर्त्यांची दिवाळी तुरूंगात; नवनीत राणांचे तुरूंगाबाहेर धरणे आंदोलन

तिवसा – शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार रवी राणा यांनी राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी आंदोलन केले होते. त्यानंतर रवी राणा यांच्यासह 16 कार्यकर्त्यांना अटक करून गुन्हे दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने रात्री उशीरा आमदार रवी राणा यांच्यासह अटक केलेल्या 16 कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन व कपाशीवर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजाराची मदत व वीज बिल माफ करावे यासाठी आमदार रवी राणा यांनी शेकडो शेतकऱ्यांना घेऊन अमरावती येथील गुरूकुंज मोझरी येथे रास्तारोको आंदोलन केले.
भारतीयांना शक्यतो करोना लसीची गरज पडणार नाही; ‘एम्स’च्या डाॅक्टरांचा दावा
पोलीसांनी रवी राणांसह 16 आदोलकांना अटक करून गुन्हे दाखल केले. त्यानंतर रात्री 11.30 च्या दरम्यान त्यांना तिवसा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आमदार रवी राणांसह 16 आंदोलक कार्यकर्त्यांची यंदाची दिवाळी तुरूंगातच पार पडणार असल्याचे दिसते.
खासदार नवनीत राणा यांना भेटण्यास रोखले
रवी राणा व इतर सोळा आंदोलकांना अमरावती कारागृहाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांना भेटण्यासाठी शनिवारी दुपारी 12 वाजता खासदार नवनीत राणा व कार्यकर्ते गेले असता त्यांना पोलीसांनी रोखले. त्यानंतर नवनीत राणा यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करून सरकारचा निषेध केला.
शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्यांचा निषेध – देवेंद्र फडणवीस
रवी राणा यांच्या अटकेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे. ‘शेतकऱ्यांना विविध मागण्यांसाठी आणि त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनी सुद्धा जेलभरो आंदोलन केले. आमदार रवी राणा हे तर आजही दिवाळीच्या दिवशी कारागृहात आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो, असे ट्विट फडणवीस यांनी केले आहे.





