Delhi Shahbad Dairy Murder : अल्पवयीन मुलीच्या मारेकऱ्याला फाशी द्या – खासदार नवनीत राणा

मुंबई – दिल्लीतील शहाबाद डेअरी परिसरात एका सोळा वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेतील आरोपी साहिलला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. सदरील घटनेतील पीडिता तरुणीच्या नातेवाईकांना न्याय मिळवण्यासाठी न्यायालयाच्या पायऱ्या झिजवायला लावू नये, असेही राणा यांनी म्हटले आहे.
या संदर्भात खासदार राणा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी न्यायव्यवस्थेला कळकळीची विनंती करत तत्काळ या प्रकरणाचा निकाल लावून आरोपीला फाशी शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
आम्ही लोकप्रतिनिधी असून सुद्धा अशा प्रकरणांमध्ये आम्हाला कॅण्डल मार्च आणि रस्त्यावर आंदोलन करावे लागत असल्याची खंत त्यांनी यामध्ये बोलून दाखवली. दिल्लीतील या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महिला या देशात किती सुरक्षित आहे, असा प्रश्न उपस्थित होतो असे देखील त्या म्हणाल्या.
या प्रकरणाचा तत्काळ निकाल लावावा आणि आरोपीला फाशी द्यावी, त्यामुळे अशा मानसिकतेच्या लोकांवर आळा बसेल, असे मतही त्यांनी मांडले आहे.





