बीड पुन्हा चर्चेत.! AI द्वारे बनावट आवाज, बोगस सही..; आमदाराच्या नावाने कोटींची लूट

मुंबई : भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या नावाचा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) गैरवापर करत बीड जिल्ह्यात 3 कोटी 20 लाख रुपयांचा निधी हडपण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रत्नागिरी येथील अधिकाऱ्यांना आमदार लाड यांच्या बनावट लेटरहेडवर खोटी सही आणि AI-निर्मित आवाजाद्वारे फसवणूक करत हा निधी वर्ग करण्यात आला. स्वत: लाड यांनी विधान परिषद सभागृहात हा प्रकार उघड केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
मंगळवारी संध्याकाळी 4:30 वाजता रत्नागिरी येथील एका अधिकाऱ्याला AI-निर्मित कॉल आला, ज्यामध्ये प्रसाद लाड यांच्याच आवाजात निधी तातडीने वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले. यासाठी लाड यांच्या नावाचे बनावट लेटरहेड आणि खोटी सही असलेले पत्र वापरण्यात आले. या फसवणुकीनंतर 3 कोटी 20 लाख रुपये बीड जिल्ह्यात वर्ग झाले. मात्र, रत्नागिरीच्या अधिकाऱ्याला संशय आल्याने त्यांनी लाड यांच्याशी थेट संपर्क साधला, तेव्हा हा घोटाळा उघडकीस आला.
बीड जिल्हा सातत्याने चर्चेत
बीड जिल्हा गेल्या वर्षभरापासून सातत्याने चर्चेत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येपासून ते अनेक घोटाळ्यांपर्यंत अनेक प्रकरणांनी जिल्ह्याचे नाव बदनाम झाले आहे. आता पुन्हा एकदा आमदाराच्या नावाचा गैरवापर करत कोट्यवधींची फसवणूक झाल्याने बीड पुन्हा प्रकाशझोतात आले आहे. या प्रकरणात चार जणांची नावे समोर आली असून त्यापैकी एक बंडू नावाचा सरपंच असल्याची प्राथमिक माहिती आहे.
लाड यांचा संताप, पोलिसांत तक्रार
आमदार प्रसाद लाड यांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “माझ्या नावाचा आणि आवाजाचा गैरवापर करून हा घोटाळा घडवण्यात आला आहे. बनावट लेटरहेड आणि सहीचा वापर करत निधी चोरण्याचे कृत्य अत्यंत गंभीर आहे,” असे त्यांनी सभागृहात सांगितले. याबाबत त्यांनी सायन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही याची माहिती दिली आहे. “बीडचे नाव ऐकताच मी अधिक सावध झालो,” असेही लाड यांनी नमूद केले.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला असून चार संशयितांची नावे समोर आली आहेत. यापैकी एका संशयिताचे नाव बंडू असून तो सरपंच असल्याची माहिती आहे. पोलिसांनी संबंधित फोन नंबरचा मागोवा घेतला असून लवकरच या घोटाळ्यामागील सूत्रधारांचा शोध लागण्याची शक्यता आहे.
AI चा दुरुपयोग, चिंता वाढली
AI तंत्रज्ञानाचा वापर करून घडवलेला हा घोटाळा सायबर गुन्हेगारीच्या नव्या आव्हानाची जाणीव करून देतो. यापूर्वीही अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना समोर आल्या असल्या, तरी आमदारासारख्या उच्चपदस्थ व्यक्तीच्या नावाचा गैरवापर करणारा हा प्रकार चिंताजनक आहे. यामुळे सायबर सुरक्षेची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून लवकरच या घोटाळ्यामागील मुख्य सूत्रधारांना अटक होण्याची अपेक्षा आहे.





