सोलापूर (प्रतिनिधी) – सरकार गोरगरिबांसाठी केलेल्या आंदोलनाचे गुन्हे दाखल करुन विरोधीपक्षांवर मानसिक दबाव आणून आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
वर्षभरापूर्वी सिव्हील हॉस्पिटलमधील सुविधांच्या अभावाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसपक्षाच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री विजय देशमुख यांना घेराव आंदोलन केले होते. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीनंतर सरकारी कामात अडथळा या आरोपावरुन प्रणिती शिंदे, चेतन नरोटे, प्रकाश वाले यांच्यासह अनेकांविरुध्द पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
हा खटला न्यायालयात सुरू झाला आहे. यावेळी गैरहजर राहिल्याने प्रणिती शिंदे यांच्यासह समर्थकांना न्यायालयाने अजामीनपात्रवारंट काढले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी अंतरीम जामीन मंजूर करण्यात आला. यात पोलीस ठाण्यात हजेरी द्यावी, असे सांगण्यात आले. यानुसार प्रणिती सोमवारी आपल्या समर्थकांसह सदरबझार पोलीस ठाण्यात आल्या.
यावेळी प्रणिती शिंदे म्हणाल्या, गरिबांसाठी आंदोलन करणे गुन्हा आहे का? विरोधीपक्षातील लोकप्रतिनिधींच हे कामच आहे. न्यायालयावर आमचा विश्वास असून सत्याला न्याय मिळेल. पण सरकार जाणीवपूर्वक विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी खटले दाखल करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.