Nagar | टोलमाफी, अंडरपास मागणीसाठी आमदार पवार यांची गडकरींशी चर्चा

कर्जत/जामखेड, (प्रतिनिधी) – कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणाऱ्या अहिल्यानगर-करमाळा महामार्गावर अंडरपास किंवा ओव्हरपास बनवणे, स्थानिक नागरिकांना टोलमाफी, मतदारसंघात ड्राय पोर्टची स्थापना आणि माहीजळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा उभारण्यास परवानगी देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
सूरत-चेन्नई या प्रस्तावित ‘ग्रीनफिल्ड कॉरिडॉर’चे काम लवकरात लवकर सुरू करावे आणि त्यासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मोबदला द्यावा, अशी मागणीही पवार यांनी केली. यासाठी त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि याबाबतचे पत्रही त्यांना दिले आहे.
कर्जत तालुक्यातील नागमठाण आणि मांदळी ही दोन्ही गावे नगर-सोलापूर महामार्गावर आहेत. मतदारसंघात अनेक धार्मिक व अध्यात्मिक स्थळे असल्याने या दोन्ही गावांमध्ये यात्रेकरुंसह विद्यार्थी,
शेतकरी आणि स्थानिक व्यावसायिक यांची मोठी वर्दळ असल्याने त्यांना दैनंदिन कामासाठी महामार्ग ओलांडणे धोकादायक ठरते.
महामार्ग ओलांडताना अपघात होऊन अनेकांचा बळी गेला आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षितपणे मार्ग ओलांडता यावा, यासाठी या दोन्ही ठिकाणी अंडरपास किंवा ओव्हरपास करण्याची मागणी आ.रोहित पवार यांनी गडकरी यांच्याकडे केली.
तसेच मतदारसंघातील शेतकऱ्यांना शेतीसाठी, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तर व्यावासायिकांना त्यांच्या व्यवसायासाठी, हॉस्पिटल किंवा सरकारी कामासाठी सतत प्रवास करावा लागतो. त्यामुळे स्थानिकांना टोलमधून माफी देण्याची मागणी केली.
कर्जत-जामखेड मतदारसंघात ‘ड्राय पोर्ट’ची गरज असल्याने कर्जत किंवा जामखेडमध्ये ‘ड्राय पोर्ट’ स्थापन करण्याची मागणी केली. ड्रायपोर्ट स्थापन झाल्यास अहिल्यानगर जिल्ह्यासह लगतच्या अन्य जिल्ह्यातील शेतीमालाच्या निर्यातीसाठीही याचा खूप मोठा फायदा होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.
शिवरायांचा पुतळ्यासाठी परवानगी द्या
कर्जत-जामखेड मतदारसंघ हा ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात अहिल्यानगर-करमाळा आणि श्रीगोंदा-जामखेड हे दोन्ही राष्ट्रीय महामार्ग एकमेकांना छेदून जाता,
त्या माहीजळगाव येथील चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी परवानगी देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी गडकरी यांच्याकडे केली.
मतदारसंघातील अनेक गावांमध्ये तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर आणि पुतळ्यामुळे मतदारसंघाच्या सौंदर्यातही भर पडणार आहे. हे ठिकाण पर्यटनस्थळ व व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण बनणार आहे.



