पिंपरी | पर्यटनाच्या माध्यमातून तालुक्याचा विकास शक्य

कर्जत, (वार्ताहर) – कोरोना महामारीत अनेक कंपन्या बंद पडल्या आणि याचा फटका बसून मोठ्या प्रमाणात बेरोजगारी झाली. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा याकरिता कर्जत येथे १८ ऑगस्ट रोजी भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आमदार महेंद्र थोरवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या रोजगार मेळाव्यात पन्नासहून अधिक कंपन्यांच्या सहभागातून अनेकांना रोजगार मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी संतोष भोईर, किरण राणे, दीपक पवार, बालाजी विचारे, संकेत भासे. शिवराम बदे, पंकज पाटील उपस्थित होते.
पर्यटनातून कर्जतचा विकास शक्य
कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटनस्थळे आहेत, परंतु प्रशासनाच्या बंदीमुळे आणि धरसोड वृत्तीमुळे पर्यटकांचे इकडे येणे कमी झाले आहे. इंग्लंड सारख्या देशाची अर्थव्यवस्था पर्यटनावर चालते, तसेच पर्यटनाच्या माध्यमातून कर्जतचा विकास शक्य आहे. तालुक्यातील पर्यटनस्थळांचा विकास केल्यास इथे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, असे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले.
येत्या १८ ऑगस्ट रोजी कर्जतमध्ये आमदार महेंद्र थोरवे प्रतिष्ठानच्या माध्यमातून भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात ५० हून अधिक कंपन्यांचा सहभाग असणार आहे. किमान पाचवी ते पदवी, पद्युत्तर अशा सर्वच उमेदवारांना मेळाव्यातून रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच ज्यांना नोकरी लागणार नाही, त्यांना जॉब कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. यासह दिव्यांग उमेदवारांना देखील प्राधान्य दिले जाणार आहे.





