Nagar : आमदार ओगले यांनी घेतली केंद्रीयमंत्री गडकरी यांची भेट

श्रीरामपूर : बेलापूर – राहुरी फॅक्टरी रस्ता चौपदरीकरणासाठी केंद्रीय मार्ग निधीतून निधी उपलब्ध करून द्या, अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी केंद्रीय सडक व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन केली आहे.
श्रीरामपूर, देवळाली प्रवरा ते राहुरी- फॅक्टरी हा १७.६०० किलो मीटर लांबीचा रस्ता दुभाजकासह चौपदरीकरण कामास निधी मिळावा. सदर रस्ता हा श्रीरामपूर तालुका व राहुरी तालुका यांना जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या अहिल्यानगरला जोडणारा मुख्य रस्ता आहे. सदर रस्ता सद्यस्थितीला वाहतुकीसाठी अपुरा पडत असून, रस्ता अरुंद असल्याने अनेक अपघात या ठिकाणी होतात.
जागतिक कीर्तीचे देवस्थान असलेले शिर्डी व श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे येणारे भाविक देखील या रस्तेमार्गे प्रवास करतात.त्यामुळे मोठ्या वर्दळीचा असलेला हा रस्ता रुंदीकरण होणे गरजेचे असून, त्याकरिता केंद्रीय मार्ग निधी (CRF) अंतर्गत कामास मंजुरी मिळावी, अशी मागणी आमदार ओगले यांनी केली आहे.
यावेळी गडकरी हे देखील या विषयाबाबत सकारात्मक असून, मतदासंघातील विविध विकास कामांचे सादर केलेले निवेदन पुढील कार्यवाहीसाठी अग्रेषित केले असल्याचे आमदार ओगले यांनी सांगितले.





