पिंपळे जगतापच्या मदतीला सरसावले आमदार निरंजन डावखरे

केंदूर – पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील भारत गॅस कंपनीकडे जाणारा रस्ता अतिशय धोकादायक झाल्याने त्या रस्त्यासाठी भारत गॅस कंपनीकडून सीएसआर निधी उपलब्ध व्हावा यासाठी पाठपुरावा करण्यात यावा अशा आशयाची विनंती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना एका पत्राद्वारे शिरूर तालुक्यातील हिवरे गावचे सुपुत्र आणि विधानपरिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. त्यामुळे या रस्त्यासाठी वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्हा परिषद यांच्याकडे पाठपुरावा करूनही निधी उपलब्ध होत नसल्याने हैराण झालेले ग्रामस्थ आमदार डावखरे यांचे आभार मानत आहेत.
गेल्या तीन वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थ ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रशासनाकडे भारतगॅस कंपनीकडे जाणारा रस्ता सुधारणा होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत मात्र नेहमी या रस्त्याकडे स्थानिक पदाधिकार्यांनी दुर्लक्ष केले जात आहे. पिंपळे जगताप ग्रामपंचायतने याबाबत जिल्हा परिषद, स्थानिक आमदार यांच्याकडे त्याचबरोबर कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे देखील सीएसआर फंडातून रस्ता करण्याची मागणी वारंवार केली आहे मात्र अद्यापपर्यंत कोणीच दखल घेतली नसल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी तालुक्यातील सुपुत्र कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे या रस्त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी साकडे घातले तात्काळ या प्रकरणाची दखल घेऊन आमदार डावखरे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना पत्र पाठवून या रस्त्यासाठी भारत गॅस कंपनीकडून सीएसआर निधी उपलब्ध व्हावा यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे.
पिंपळे जगताप (ता. शिरूर) ग्रामपंचायतच्या हद्दीत भारत पेट्रोलियम गॅस कंपनीच्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची दुरवस्था झाल्याने येथील ग्रामस्थांची गैरसोय होत असल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. गेल्या १५ वर्षांपासून चाकणरोड ते भारत गॅस कंपनीपर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती न केल्याने आणि भारत गॅस कंपनीच्या अवजड वाहतुकीमुळे हा रास्ता येथील ग्रामस्थांना वापरण्यासाठी अतिशय धोकादायक स्थितीत आहे या रस्त्याचा वापर सणसवाडी आणि कोरेगाव भीमा परिसरातील कारखान्यात रोजगारासाठी जाणारे करंदी, जातेगाव, केंदूर परिसरातील कामगार वापर करत आहेत परंतु या रस्त्याला मोठे खड्डे पडून खड्यात पाणी साचले आहे त्यामुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे या रस्त्यावर अनेकवेळा अपघातही घडले आहेत. त्याचबरोबर रस्त्याच्या दुतर्फा गॅसच्या टाक्या भरून उभे असलेले ट्रक त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान, पिंपळे जगताप ग्रामपंचायतने अनेकवेळा गॅस कंपनीकडे उर्वरीत एक किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती मात्र कंपनी प्रशासन दाद देत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी आमदार डावखरे यांच्याकडे साकडे घातले होते त्यानंतर आमदार निरंजन डावखरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला आहे. दरम्यान, यापूर्वी अनेकवेळा स्थानिक युवक किरण ढोकले, संग्राम ढोकले, महेश जगताप यांनी देखील या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला आहे.





