Pabal News : आमदार निरंजन डावखरे यांची पाबळला सभा
Pabal News : भारतीय जनता पक्षाने पाबळ जिल्हा परिषद गटातून विकासनाना गायकवाड, पाबळ गणातून दीपक खैरे आणि केंदूर गणातून आशा साकोरे यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे.

पाबळ : जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांची जाहीर सभा पाबळ येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने या गटात प्रचाराची मोठी आघाडी घेतली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.
भारतीय जनता पक्षाने पाबळ जिल्हा परिषद गटातून विकासनाना गायकवाड, पाबळ गणातून दीपक खैरे आणि केंदूर गणातून आशा साकोरे यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. आमदार निरंजन डावखरे हे मूळचे हिवरे गावचे असून, यातील दोन उमेदवारही याच गावचे आहेत. विशेष म्हणजे, नागपूर येथे झालेल्या पाणी प्रश्न निवारण बैठकीला डावखरे उपस्थित होते, त्यामुळे या भागातील पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी ते सभेत कोणती भूमिका मांडणार, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेत्या जयश्री पलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुका लढवल्या जात असून, तळागाळातील नागरिकांपर्यंत पक्षाचे व्हिजन पोहोचवले जात आहे. विरोधकांकडे सामाजिक गरजांचे भान आणि कोणतेही व्हिजन नसून, भाजपच या गटातील समस्या सोडवू शकते, असा विश्वास पलांडे यांनी व्यक्त केला. तसेच, येत्या २ किंवा ३ तारखेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.


