छत्रपतींच्या उपोषणाला आमदार महेश लांडगे यांचे समर्थन

पिंपरी -मराठा समाजाला आरक्षण मिळावे, तसेच राज्य सरकारने आठ महिन्यांपूर्वी मान्य केलेल्या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी. यासाठी खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पुकारलेल्या उपोषणाला भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी समर्थन दर्शविले आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे यांनी शनिवारपासून मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणास सुरुवात केली आहे. याबाबत बोलताना आमदार लांडगे म्हणाले की, मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे उपोषण करीत आहेत. मराठा आरक्षण आणि विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सुरू केलेल्या या लढ्याला पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने माझे समर्थन आहे. ज्यांना आझाद मैदानावर जाणे शक्य होणार नाही, अशा बांधवांनी आपआपल्या परीने उपोषणाला समर्थन द्यावे, असे आवाहनही आमदार लांडगे यांनी केले.
राज्य सरकारने मराठा समाजाची आरक्षणापासून होरपळ कमी करावी आणि मान्य केलेल्या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी समाजाची मागणी आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र मराठा समाजाच्या हक्कांसाठी सनदशीर मार्गाने लढा करेल, यात तीळमात्र शंका नाही, असा विश्वासही आमदार लांडगे यांनी व्यक्त केला. मराठा आरक्षण मिळण्यासाठी न्या. भोसले समितीने केलेल्या शिफारशींची देखील अंमलबजाणी करण्यास तात्काळ सुरुवात करून लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी लागणारी प्रक्रिया सुरू करावी. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाद्वारे दिला जाणारा दहा लाख रुपये कर्ज व्याज परतावा हा 25 लाख रुपये करण्यात यावा. या मागणीवर सरकारने सकारात्मकता दाखवली होती. मात्र अद्यापही याची अंमलबजावणी केलेली नाही.
काय आहेत मागण्या?
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या आंदोलकांच्या वारसांना नोकरी देण्याची घोषणा सरकारनेच केली होती. मात्र, कुणालाही नोकरी दिलेली नाही. याउलट काही वारसांना एसटी महामंडळात नोकरी देण्याचे प्रस्तावित केले जात आहे. हे समाजाला मान्य नाही. विशेष बाब म्हणून निर्णय घेऊन सरकारी नोकरी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घ्यावा.





