Satara | आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधात महाविकास आघाडीचे ठरेना

सातारा, (प्रतिनिधी) – सातारा-जावळी मतदारसंघातील विद्यमान हेवीवेट आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोधकांना हलक्यात न घेता पुन्हा एकदा मुळातून प्रचाराचा झंझावात सुरू ठेवला आहे .त्यामुळे त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार कोणता द्यायचा यामध्ये अद्यापही महाविकास आघाडीमध्ये खल सुरू आहे.
महाविकास आघाडीच्या हर्षल कदम यांना पाटण मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने संधी दिली आहे. त्याच पद्धतीने साताऱ्यातही ठाकरे गटाला हा मतदारसंघ जाऊ शकतो.
अशा हालचाली वाढू लागलल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीकडून इच्छित असलेल्या दीपक पवार व अमित कदम यांच्या राजकीय आकांक्षांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीची दुसरी यादी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे 2019 च्या निवडणुकीमध्ये आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना एक लाख 5,778 म्हणजे एकूण मतदानाच्या 64 टक्के मते मिळाली होती.
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे पाचव्यांदा आमदार बनवण्याच्या तयारीत आहेत. सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघावर त्यांची हुकमी पकड आहे. त्यामुळे साताऱ्यातून महाविकास आघाडीला उमेदवार देताना पूर्ण विचारांती द्यावा लागणार आहे.
राष्ट्रवादी शरद पवार यांनी जिल्ह्यामध्ये चांगलेच लक्ष घातले आहे. सातारा जिल्हा पवारांच्या विचारांना मान देतो अशी परिस्थिती होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोरल्या पवारांचा शब्द आजही प्रमाण मानला जातो.
पण, सध्या परिस्थिती प्रतिकूल आहे. राष्ट्रवादी बालेकिल्ला बनवण्यासाठी शरद पवार जंग-जंग पछाडत आहेत. साताऱ्यातील राजघराण्याविषयी पवारांना ममत्व असले तरी राजघराण्याचे वारसदार मात्र सध्या सत्तेचा रोख ओळखून भाजपमध्ये आहेत. त्या दृष्टीने पवारांनी अद्याप कोणताही उमेदवार तिथे जाहीर केलेला नाही.
महायुतीतील कदाचित हा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेला सुटू शकतो अशा चर्चांना आता सुरुवात झाली आहे. येथून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते हे प्रमुख उमेदवार असणार आहेत.
सचिन मोहिते यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून एक आक्रमक लढवय्या म्हणून आपली प्रतिमा तयार केली आहे.
मात्र, तरीही शिवेंद्रसिंह राजे यांच्या सोबतची त्यांची लढत इतकी सोपी असणार नाही अर्थात अद्यापही उमेदवार जाहीर झालेला नाही. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजांच्या समोर कोण आव्हान उभे करणार हा अजूनही कळीचा मुद्दा आहे.
महाविकास आघाडीच्या दुसऱ्या यादीची उत्सुकता
शरद पवार राष्ट्रवादीकडून दीपक पवार व अमित कदम इच्छुक आहेत. सातारा मतदारसंघ सेनेला सुटल्यास येथे बंडखोरी होण्याची भीती आहे. मतांची विभागणी टाळण्यासाठी पवारांनाच ज्येष्ठत्वाच्या नात्याने राजकीय तडजोडी करून डॅमेज कंट्रोल करावे लागेल अर्थात महाविकास आघाडीच्या चर्चेची गाडी काय राजकीय वळण घेणार हा मुद्दा येथे महत्वाचा ठरेल.
महायुतीचा साताऱ्यातून उमेदवार निवडून देण्यासाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना जोर लावून काम करावे लागणार आहे. महाविकास आघाडीची दुसरी यादी अत्यंत महत्त्वपूर्ण असून ती केव्हा जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे




