पुणे जिल्हा | आमदार जगतापांचा रात्री 11 पर्यंत ठिय्या

सासवड, (प्रतिनिधी) – पुरंदर उपसा योजनेच्या गैरकारभारामुळे 19 जून पासून जवळपास गेली दोन महिने पुरंदर उपसा जलसिंचन योजना बंद आहे.
यामुळे लाभार्थी गावांतील शेतकर्यांचे मोठे नुकसान होत असून आता शेतकर्यांचा अंत पाहू नका, ही योजना ताबडतोब सुरू करा, या मागणीसाठी सासवड येथील पुरंदर उपसाच्या कार्यालयात सोमवारी (दि. 5) रात्री आमदार संजय जगताप यांनी रात्री 11 वाजेपर्यंत ठिय्या मांंडला.
चार तास ठाण मांडून अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. शाखा अभियंता धैर्यशील भेलके कार्यालयात हजर होईपर्यंत कार्यालय सोडणार नाही अशी भूमिका आमदार संजय जगताप यांनी घेतली होती.
यावेळी कार्यकारी अभियंता नितीन जयस्वाल, उपअभियंता मुकेश विरनक, उपअभियंता गौतम शिंदे यांसह योजनेचे अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते. पुरंदरच्या पश्चिम भागात पाऊस झाल्याने क-हेला पाणी आले आहे.
मात्र पूर्व भागात पुरंदर उपसाच्या लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण अत्यल्प असून सध्या पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू असल्याची परीस्थिती आहे. शेतकर्यांची पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. सध्या खडकवासला व परिसरातील धरणक्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने मुळा-मुठा नदीला पाणी आहे.
हे पाणी उचलून लाभक्षेत्रातील ओढे, नाले, तलाव भरून घेणे गरजेचे असून तशी शेतक-यांची मागणी आहे., असे सांगत आमदार संजय जगताप यांनी, शेतक-यांना पाण्यापासून वंचित ठेवायचे आहे का असाही जाबही विचारला.
कार्यकारी अभियंता नितीन जयस्वाल यांनी, मंगळवार (दि. 6) पासून एक पंपाचे 48 तास व त्यानंतर दुसर्या पंपाचे 48 तास टेस्टींग झाल्यावर दोन्ही पंप पुर्ण क्षमतेने सुरू करून पाण्याचे नियोजन व वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे सांगितले.
इलेक्ट्रिक विभागाच्या अडचणींबाबत चांगल्या एजन्सीची मदत घेऊ असे सांगत 4 कोटी 50 लाखांच्या निधीतून योजनेच्या सहा टप्प्यांतील प्रत्येकी चार पैकी दोन मोटार दुरूस्त करणे, वॉकिटॉकी यंत्रणेचा नव्याने समावेश तसेच इलेक्ट्रिक बाबत दुरूस्तीसाठी 2 कोटी 5 लाखांचा खर्च होणार असल्याचे स्पष्ट केले.
आमदार जगतापांचा इशारा
साडेचार कोटी रूपयांच्या निधीतून केलेल्या कामांची माहिती जाहीर करा
लाभार्थी शेतकर्यांना शाश्वत पाणी किती दिवसांत तसेच या पाण्याचे नियोजन व वेळापत्रक शेतकर्यांना माहितीसाठी जाहीर करा
इलेक्ट्रिक विभागाच्या अडचणींबाबत ठोस कार्यवाही करा
योजनेची प्रत्यक्षस्थिती जाहीर करा
जेणेकरून शेतकर्यांना योग्य माहिती मिळून पिकांचे नियोजन करता येईल
योजनेच्या अधिका-यांनी यामध्ये कोणतेही राजकारण करून योजना अडचणीत आणू नये
फिल्डवरही अभियंता नव्हतेच?
याप्रसंगी शाखा अभियंता धैर्यशील भेलके यांच्या बाबत चार शेतक-यांनी लेखी अर्ज दिल्याने त्यांच्याकडील विभागाबाबत आमदार संजय जगताप यांना माहिती घ्यायची असल्याचे त्यांनी अधिका-यांना बैठक बोलवितानाच स्पष्ट केले होते. मात्र बैठक सुरू होऊन चार तासानंतरही भेलके कार्यालयात अथवा फोनवर उपस्थित राहिले नाहीत.
उपस्थितीत अधिका-यांना ते फिल्डवर असल्याचे सांगितले. मात्र बैठकीस उपस्थित असणार्या काही शेतकर्यांनी त्यांच्या उरूळी कांचन परिसरातील पुरंदर उपसाच्या तिनही पंप हाऊसवर आपल्या नातेवाइकांना पाठवून मोबाइलवर लाईव्ह केले असता संबंधित अभियंता तर कोणत्याही पंप हाऊसवर आढळून आला नाहीच मात्र इतर कर्मचारीही तेथे उपस्थित नसल्याने आढळून आले. भेलकेंवर काय कारवाई करणार हे स्पष्ट करा, अशी मागणी शेतकर्यांनी केली.





