मांजरी नदीवरील पुलाचा निधी तत्काळ देण्याची मागणी; आमदार चेतन तुपे विधानसभेत आक्रमक

हडपसर (मांजरी बुद्रुक) – केशवनगर येथील प्रजिमा ५६ आणि प्रजिमा ३४ या रस्त्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही गावे पुणे मनपात नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. नागरी वस्तीचे प्रमाण अधिक असलेल्या या दोन्ही गावांमध्ये प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मांजरी बुद्रुक येथे मुळा-मुठा नदीवरील पुल अर्धवट बांधण्यात आल्याने नागरिकांना गैरसोय सहन करावी लागते आहे.त्यासाठी आवश्यक असलेला निधी तत्काळ देण्यात यावा याकडे
आमदार चेतन तुपे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून २५ कोटी निधी या पुलाच्या कामासाठी मंत्री महोदयांकडे प्रस्तावित आहे. मात्र ,अद्यापही जैसे थे स्थिती असल्याने मांजरी बुद्रुक ,केशवनगर परिसरातल्या नागरिकांना वाहतूक कोंडी सहन करावी लागते आहे. अर्धवट पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध व्हावा, अशी आग्रही मागणी त्यांनी विधानसभेत केली आहे. पुलावरून एकटा आमदार प्रवास करणार नाही . तर परिसरातील नागरिक रोज ये-जा करणार आहेत. किमान त्यांचा विचार करून तरी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली.
“विरोधी बाकावरील आमदार म्हणून याभागातील विकास कामांसाठी निधी कमी दिला जात आहे. ज्यामुळे येथील रस्ते आणि पूल अर्धवट स्थितीत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. केवळ राजकारण केले जावून नागरिकांना त्यांच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यापासून हे सरकार त्यांना वेठीस धरत आहे.” – चेतन तुपे (आमदार, हडपसर विधानसभा)





